प्रमोदचे ऐतिहासिक सुवर्ण यश

विश्वविजेत्या प्रमोद भगतने शनिवारी पॅरालिम्पिकमधील पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल३ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली.

मनोज सरकार

टोक्यो : विश्वविजेत्या प्रमोद भगतने शनिवारी पॅरालिम्पिकमधील पुरुष एकेरी बॅडमिंटन एसएल३ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. मनोज सरकारने कांस्यपदक जिंकत हा आनंद द्विगुणित केला.

यंदा पॅरालिम्पिकमध्ये प्रथमच बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील ३३ वर्षीय प्रमोदने ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला अंतिम फेरीत २१-१४, २१-१७ असे ४५ मिनिटांत नामोहरम केले.

तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत ३१ वर्षीय मनोजने जपानच्या दैसुके फुजिहाराला २२-२०, २१-१३ असे हरवले. उपांत्य लढतीत मनोजने ब्रिटनच्या द्वितीय मानांकित डॅनियल बेथेलकडून ८-२१, १०-२१ असा पराभव पत्करला. मनोजला वयाच्या पाचव्या वर्षीपासून बॅडमिंटनची आवड होती. मोठय़ा भावाला नमवण्यात आनंद मानण्यात प्रारंभी त्याला धन्यता वाटायची; पण २०११ पासून त्याने व्यावसायिक खेळाला प्रारंभ केला.

भालाफेक

नवदीपचे कांस्यपदक हुकले!

भारताच्या नवदीपला पुरुषांच्या भालाफेकीतील एफ-४१ श्रेणीत कांस्यपदकाने हुलकावणी दिली. नवदीपने चौथ्या प्रयत्नात ४०.८० मीटर अंतरावर भालाफेक करून सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. परंतु इराकच्या विल्डन नुखालावीने पाचव्या प्रयत्नात ४१.३९ मीटर अंतर सर करून कांस्यपदक जिंकले. चीनच्या पेनझियांग सनने (४७.१३ मी.) सुवर्ण, तर इराणच्या सादेघ सय्यदने (४३.३५ मी.) रौप्यपदकावर नाव कोरले.

आणखी चार पदकांच्या आशा

सुहास यथिराज आणि कृष्णा नागरने पुरुष एकेरी बॅडमिंटनची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे रविवारी भारताच्या खात्यावर बॅडमिंटनमधून दोन पदके जमा होऊ शकतील, तर उपांत्य लढत गमावल्यामुळे कांस्यपदकाची लढत खेळणाऱ्या तरुण ढिल्लाँ आणि प्रमोद-पलक कोहली जोडीकडून दोन पदकांची आशा करता येईल.

  • सुहासने उपांत्य लढतीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानवर २१-९, २१-१५ असा ३१ मिनिटांत विजय मिळवला. रविवारी त्याची फ्रान्सच्या अग्रमानांकित ल्युकास मझूरशी गाठ पडेल.
  • द्वितीय मानांकित २२ वर्षीय कृष्णाने ब्रिटनच्या क्रिस्टिन कूम्बसचा २१-१०, २१-११ असा पाडाव केला. हाँगकाँगच्या शू मान कायशी त्याचा रविवारी सामना होईल.
  • अन्य उपांत्य लढतीत तरुणचा ल्युकासपुढे निभाव न लागल्याने १६-२१, २१-१६, १८-२१ असा पराभूत झाला. सेटियावानशी त्याची रविवारी लढत होईल.
  • रविवारी मिश्र दुहेरीत प्रमोद-पलक जोडीपुढे जपानच्या

दैसुके फुजिहारा आणि अकिको सुगिनो जोडीचे आव्हान असेल. उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांनी इंडोनेशियाच्या हॅरी सुसांतो आणि लीनी रात्री ओकिटिला जोडीकडून ३-२१, १५-२१ अशी हार पत्करली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Historical gold to pramod b tokyo paralympics akp