Chennai Super Kings vs Punjab Kings: आयपीएल २०२६ स्पर्धेतील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यातील पहिल्या डावात आयुष म्हात्रेच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. आयुष म्हात्रेने ७३ धावांची दमदार खेळी केली. चेन्नईने पंजाबसमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान ठेवले होते. पण चेन्नईचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करू शकले नाहीत. पंजाब किंग्ज संघाने हा सामना ५ गडी राखून जिंकून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे.

पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी २१० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाला हवी तशी सुरुवात मिळाली. सलामीला आलेल्या प्रियांश आर्यने अवघ्या ११ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ३९ धावांची खेळी केली. तर प्रभसिमरन सिंगने ३४ चेंडूंचा सामना करुन ६ चौकार आणि १ षटकारांच्या साहाय्याने ४३ धावांची खेळी केली. सर्फराज खानने त्याला धावबाद करून माघारी धाडलं. त्यामुळे त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. गेल्या सामन्यातील विजयाचा हिरो ठरलेल्या कुपर कॉनोलीला चांगली सुरूवात मिळाली होती. पण तो २२ चेंडूत ३६ धावा करून माघारी परतला.

पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. तो अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. तरीदेखील त्याने २९ चेंडूंचा सामना करुन ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ५० धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये चेन्नईने लागोपाठ २ विकेट्स घेऊन पुनरागमन केलं. पण शशांक सिंगने १४ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. यासह पंजाबने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला.

या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनची जोडी मैदानावर आली. पण या जोडीला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. संजू सॅमसन अवघ्या ७ धावा करून माघारी परतला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि आयुष म्हात्रेने मिळून संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून ९६ धावांची भागीदारी केली. यादरम्यान ऋतुराज गायकवाड २८ धावा करून माघारी परतला. तर आयुष म्हात्रेने ४३ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. शिवम दुबेने २७ चेंडूत नाबाद ४५ धावांची खेळी केली. शेवटी सर्फराज खानने १२ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकांअखेर ५ गडी बाद २०९ धावा केल्या.