India vs Zimbabwe: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामने सुरू आहेत. इंग्लंडने सुपर ८ फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर इतर संघ सेमी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने साखळी फेरीत दमदार कामगिरी केली होती. पण सुपर ८ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारतीय संघाने ७६ धावांनी गमावला.

भारतीय संघाचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाला जर सेमी स्पर्धेत टिकून राहायचं असेल, तर हा सामना जिंकण खूप गरजेचं आहे. दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरताच असं काही घडणार आहे, जे गेल्या २४ वर्षात कधीच घडलं नव्हतं.

झिम्बाब्वेचा संघ हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच इतिहास घडणार आहे. गेल्या २४ वर्षात झिम्बाब्वेचा संघ पहिल्यांदाच भारतात भारतीय संघाचा सामना करणार आहे. याआधी २००२ मध्ये दोन्ही संघ भारतात आमनेसामने आले होते. दिल्लीच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांचा सामना रंगला होता. त्यावेळी सौरव गांगुली हे भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यानंतर २४ वर्षे उलटून गेले आहेत, पण भारत आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ भारतात आमनेसामने आले नव्हते.

भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा सामना

भारतीय संघाला या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण आता स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये स्थान मिळवणं ही कठीण झालं आहे. साखळी फेरीत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला होता. भारतीय संघाने साखळी फेरीतील चारही सामने जिंकले होते. त्यामुळे सुपर ८ मध्येही भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप राहिले. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना ७६ धावांनी गमवावा लागला. आता भारतीय संघाला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर झिम्बाब्वेला मोठ्या फरकाने हरवावं लागणार आहे.