scorecardresearch

बुवा साळवी यांच्याशिवाय कबड्डीचा इतिहास अपूर्ण -पवार

कबड्डीमहर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्याशिवाय कबड्डीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शरद पवार यांच्या हस्ते वसंत ढवण आणि पुण्याच्या शुभांगी दाते-जोगळेकर यांना कबड्डी महायोद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (छाया : दिनेश घाडिगावकर)

मुंबई : कबड्डीमहर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्याशिवाय कबड्डीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पवार यांच्या हस्ते ‘कबड्डीचे १०० महायोद्धे’ या पुस्तकाचे शुक्रवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमी येथे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात पवार म्हणाले, ‘‘कबड्डी की हुतुतू हा वाद जेव्हा चालू होता, तेव्हा हा वाद सोडवण्यासाठी साळवी यांनी अथक प्रयत्न केले. ‘एक खेळ, एक संघटना’ या सूत्रानुसार खेळाला एका छत्राखाली आणले. खेळाडूंवर त्यांचा वचक होता. त्यामुळे साळवी यांचे योगदान आपण विसरूच शकत नाही. वासंती सातव, साधना धारिया, सदा शेटय़े, यांच्यासारख्या अनेक खेळाडूंमुळे कबड्डीचा इतिहास समृद्ध झाला आहे.’’

‘‘क्रिकेटच्या निमित्ताने मी अनेक देशांचे दौरे केले. तेथील क्रिकेटच्या वास्तूंमध्ये कामगिरी आणि विक्रमांच्या नोंदी आढळतात. अशा प्रकारे कबड्डीतसुद्धा व्हावे, यासाठी या पुस्तकाच्या निमित्ताने पहिले पाऊल पडले आहे. आगामी पिढीसाठी ‘महायोद्धा’चा इतिहास प्रेरणादायी ठरेल,’’ असे पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर, उपाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाई जगताप उपस्थित होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: History kabaddi incomplete indoor sport player game ysh

ताज्या बातम्या