Big Record At Lords Cricket Ground, AUS vs SA Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक ५ गडी बाद केले. यासह ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला. या धावांचा बचाव करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक मोठे धक्के दिले. यादरम्यान असं काही घडलं जे गेल्या १४५ वर्षांत कधीच घडलं नव्हतं.
सामन्यातील पहिल्या दिवशी कगिसो रबाडाने लक्षवेधी कामगिरी केली. त्याने ५ गडी बाद करत ऑस्ट्रेलियन बॅटिंग लाइन अपचं कंबरडं मोडलं. त्याला मार्को यान्सेनने चांगली साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव २१२ धावांवर आटोपला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा संघ इतक्या सहजासहजी हार मानत नाही. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर जोश हेजलवूड , मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सचं त्रिकुट भारी पडलं. पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेला ४ गडी बाद ४३ धावा करता आल्या.
सामन्यातील पहिल्या दिवशी असं काही घडलं जे गेल्या १४५ वर्षांत कधीच घडलं नव्हतं. इंग्लंडमध्ये झालेल्या ५६१ कसोटी सामन्यांमध्ये पहिल्यांदाच असं घडलं की, दोन्ही संघातील पहिल्या क्रमांकाचे फलंदाज पहिल्या डावात शून्यावर माघारी परतले. ऑस्टेलियाकडून सलामीला आलेला उस्मान ख्वाजा आणि दक्षिण आफ्रिकेकडून सलामीला आलेला एडन मार्करम दोघेही शून्यावर बाद होऊन माघारी परतले.
कगिसो रबाडाने या डावात गोलंदाजी करताना १५.४ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ५१ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. यासह त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये ॲलेन डोनाल्डला मागे सोडलं आहे. त्यांच्या नावे ३३० गडी बाद करण्याची नोंद होती. आता ७१ सामन्यांमध्ये ३३२ गडी बाद करत रबाडा हा दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज चमकले, पण फलंदाजांना हवी तशी सुरूवात करून देता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेचे टॉप ४ फलंदाज स्वस्तात माघारी परतले . सलामीला आलेला एडन मार्करम शून्यावर माघारी परतला. तर रायन रिकल्टन १६, मुल्डर ६ आणि स्टब्स अवघ्या २ धावा करत माघारी परतला. दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवशी ४ गडी बाद ४३ धावा करता आल्या. त्यानंतर कर्णधार टेंबा बावुमाने ३६ धावांची खेळी केली. तर बेडिंघमने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना पॅट कमिन्सने सर्वाधिक ६ गडी बाद केले. यासह दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १३८ धावांवर आटोपला.