शाहाबाद मार्कंडा या गावी प्रतिभावान हॉकीपटू घडविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रशिक्षक बलदेव सिंग यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ७५ वर्षीय बलदेव यांना २५ मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नागरी पुरस्काराने सन्मानित केले जाईल, असे अधिकार्यांनी बुधवारी सांगितले.
बलदेव यांनी १९८२ मध्ये हरियाणा क्रीडा विभागाचे प्रशिक्षक म्हणून शाहाबाद मार्कंडाला भेट दिली होती आणि तिथे चार वर्षे काम केले.

१९९३ मध्ये त्यांनी पुन्हा गावात येऊन तेथील ‘शाहाबाद हॉकी नर्सरी’ला देशातील सर्वोत्कृष्ट हॉकी प्रतिभा निर्माण करणारे केंद्र बनवले, असे अधिकार्यांनी सांगितले. बलदेव यांनी ८० हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आणि आठ भारतीय कर्णधारांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी १९९३ मध्ये कनिष्ठ पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्ते म्हणून काम केले.

१९९६ मध्ये मद्रास येथे झालेली चॅम्पियन्स करंडक जिंकणार्या भारतीय संघाचे ते साहाय्यक प्रशिक्षक होते. नंतर त्यांनी २००१ ते २००४ या कालावधीत भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २००४च्या आशिया चषकात सुवर्णपदक जिंकले. चार दशकांहून अधिक काळ बलदेव यांनी भारतीय हॉकीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

त्यांनी श्री गुरू ग्रंथ साहिब जागतिक विद्यापीठ, फतेहगड साहिब, खालसा महाविद्याकय, अमृतसर येथे हॉकी प्रशिक्षक म्हणून काम केले. २०२० टोक्यो, २०२४ पॅरिस आणि २०२८ लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ऑलिम्पिक टास्क फोर्सचे मुख्य सदस्य म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे.