२२ ऑक्टोबरपासून मलेशियात होणाऱ्या सातव्या सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने १८ सदस्यीय संघाची आज घोषणा केली. विवेक सागर प्रसादकडे भारतीय संघाचं कर्णधारपद देण्यात आलं असून प्रताप लाक्रा संघाचा उप-कर्णधार असणार आहे. या स्पर्धेत भारत आपला सलामीचा सामना जपानच्या संघाविरुद्ध खेळणार आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय संघ ११ सप्टेंबरपासून लखनऊ येथील ‘साई’च्या प्रशिक्षक केंद्रात सराव करत होता. यादरम्यान ज्युनिअर हॉकी संघाचे प्रशिक्षक ज्युड फेलिक्स यांनी सर्व खेळाडूंकडून भरपूर सराव करुन घेत संघांची निवड केली आहे. एक वर्षाच्या कालावधीनंतर भारत या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत आहे. २०१५ साली झालेल्या स्पर्धेत भारत उप-विजेता ठरला होता. अंतिम सामन्यात भारतीय संघाला ग्रेट ब्रिटनच्या संघाकडून हार पत्करावी लागली होती.

“स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही सर्व ज्युनिअर खेळाडूंची तयारी करुन घेतली आहे. या संघाचा आपल्यावर संपूर्णपणे विश्वास असून भारताचा संघ यंदाच्या स्पर्धेत नक्कीच कमाल करुन दाखवेल”, असा आत्मविश्वास प्रशिक्षक ज्युड फेलिक्स यांनी व्यक्त केला. या स्पर्धेत चांगली सुरुवात केल्यास आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघ अजुनही चांगल्या पद्धतीने तयार होईल, असंही प्रशिक्षक फेलिक्स यांनी म्हणलंय.

सुलतान जोहर चषकासाठी असा असेल भारतीय संघ –

गोलकिपर – पंकजकुमार रजक, सेंथामिझ आरसु शंकर

बचावफळी – सुमन बेक, प्रताप लाक्रा (उप-कर्णधार), सुखजित सिंह, वरिंदर सिंह, मनदीप मोर, संजय

मधली फळी – हरमनजीत सिंह, रबिचंद्र सिंह मोरिंगथम, विवेक सागर प्रसाद (कर्णधार), विशाल सिंह, विशाल अंतिल

आघाडीची फळी – शैलंद लाक्रा, रोशन कुमार, अभिषेक, दिलप्रीत सिंह, मणिंदर सिंह