Indian hockey team saffron jersey controversy Dilip Tirkey statement: आगामी एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या पारंपरिक निळ्या जर्सीऐवजी भगव्या रंगाची जर्सी वापरण्याच्या निर्णयावरून वाद अधिकच चिघळला आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी शुक्रवारी महासंघातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना दोन स्वतंत्र ई-मेल पाठवत या निर्णयाबाबत सविस्तर स्पष्टीकरण मागितलं आहे.

माजी भारतीय कर्णधार असलेल्या तिर्की यांनी आपल्या ई-मेलमध्ये हा निर्णय कार्यकारी मंडळासमोर मांडण्यात आला नव्हता किंवा त्यांनाही याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, असा दावा केला. निळ्या जर्सीऐवजी भगव्या रंगाची जर्सी स्वीकारण्याचा निर्णय नेमका कसा आणि कोणाच्या मंजुरीने घेण्यात आला, याचा संपूर्ण तपशील सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जर्सीच्या रंगावरून हॉकी इंडियात वाद उफाळला

या ई-मेलमुळे हा वाद केवळ सार्वजनिक टीकेपुरता मर्यादित न राहता हॉकी इंडियाच्या अंतर्गत व्यवस्थेपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी राष्ट्रीय संघाच्या जर्सीमध्ये करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या बदलामागील प्रक्रिया आणि निर्णय घेण्याच्या अधिकारावर खुद्द महासंघाच्या अध्यक्षांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याआधी इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जर्सीचा रंग बदलण्याबाबत भारतीय खेळाडूंशी कोणतीही चर्चा करण्यात आली नव्हती. अनेक खेळाडूंना नव्या जर्सीची माहितीही जर्सी त्यांच्यासमोर सादर करण्यात आल्यानंतरच मिळाली होती.

शुक्रवारी सकाळी ‘भारतीय राष्ट्रीय संघाच्या जर्सीच्या रंगातील बदलाबाबत स्पष्टीकरण’ या विषयासह पाठवलेल्या पहिल्या ई-मेलमध्ये दिलीप तिर्की यांनी कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना स्पष्ट केलं की, हा वाद जर्सीच्या रंगाबाबत नसून तो निर्णय घेण्याच्या प्रक्रियेबाबत आहे. ई-मेलमध्ये तिर्की यांनी म्हटलं, “भारतीय राष्ट्रीय संघाच्या जर्सीच्या रंगात अलीकडे करण्यात आलेल्या बदलाकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. हा निर्णय कार्यकारी मंडळासमोर चर्चेसाठी न मांडता आणि मला कोणतीही पूर्वकल्पना न देता घेण्यात आला तसेच त्याची अंमलबजावणीही करण्यात आली, असं दिसून येत आहे.”

पुढे तिर्की यांनी स्पष्ट केलं, “माझा आक्षेप भगव्या रंगाला नाही. मात्र, राष्ट्रीय संघाची ओळख आणि प्रतिनिधित्वाशी संबंधित इतका महत्त्वाचा निर्णय अंमलात आणण्यापूर्वी निवडून आलेल्या नेतृत्वाशी आणि कार्यकारी मंडळाशी चर्चा होणं अपेक्षित होतं.” जर्सीच्या रंगबदलावरून सुरू झालेल्या राजकीय वादाचाही त्यांनी उल्लेख केला. “या निर्णयानंतर माध्यमांमध्ये या विषयाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली असून, काही ठिकाणी त्याला राजकीय रंगही देण्यात आला आहे. विश्वचषक स्पर्धा जवळ आल्याने संघ आणि त्याच्या तयारीवरच लक्ष केंद्रित राहावं, यासाठी मी सार्वजनिकपणे हा निर्णय पूर्णपणे क्रीडाविषयक असल्याचं स्पष्ट केलं,” असं तिर्की यांनी नमूद केलं.

याशिवाय, या प्रकरणी ओडिशा सरकारनेही स्पष्टीकरण मागितल्याचं तिर्की यांनी उघड केलं. “या विषयावर ओडिशा सरकारनेही माझ्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यामुळे हॉकी इंडियाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला, त्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबण्यात आली आणि कोणत्या परिस्थितीत त्याला मंजुरी देऊन अंमलात आणण्यात आलं, याचा सविस्तर लेखी खुलासा शक्य तितक्या लवकर द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

यानंतर दिलीप तिर्की यांनी हॉकी इंडियाचे कार्यकारी संचालक आर. के. श्रीवास्तव यांना आणखी एक ई-मेल पाठवत ३१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यकारी मंडळातील सर्व सदस्यांना या प्रकरणावर सविस्तर अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले. या अहवालात पुढील बाबींचा समावेश असावा, असे तिर्की यांनी स्पष्ट केलं आहे,

  • भारतीय राष्ट्रीय संघाच्या पारंपरिक निळ्या जर्सीऐवजी नवीन रंग स्वीकारण्यामागील पार्श्वभूमी आणि कारणे.
  • हा निर्णय कोणत्या अधिकाराअंतर्गत घेण्यात आला.
  • निर्णय घेण्याची संपूर्ण प्रक्रिया तसेच त्यामध्ये कोणते अधिकारी, समित्या किंवा अन्य व्यक्ती सहभागी होत्या.
  • अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, विद्यमान खेळाडू, प्रशिक्षक, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू किंवा अन्य संबंधित घटकांशी कोणतीही चर्चा किंवा सल्लामसलत करण्यात आली होती का.
  • तसेच, सार्वजनिक घोषणा करण्यापूर्वी अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाला याबाबत माहिती का देण्यात आली नाही किंवा त्यांच्याशी चर्चा का करण्यात आली नाही.

दरम्यान, एफआयएच हॉकी विश्वचषक १५ ते ३० ऑगस्टदरम्यान नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये आयोजित केला जाणार आहे.