बांगलादेश येथे सुरू असलेल्या १८ वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने गुरूवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली. उपांत्य फेरीच्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ३-१ असा धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
यापूर्वी दोन्ही संघांनी या स्पर्धेचे चांगल्यापैकी यश मिळवले होते. भारताने २००१मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते, तर २००९ मध्ये पाचवे स्थान मिळवले होते. पाकिस्ताननेही २००९ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद व २०११ मध्ये कांस्यपदक मिळवले होते.
दरम्यान, पुढील महिन्यात मलेशिया येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे वरिष्ठ हॉकी संघ आमनेसामने येणार आहेत. ही स्पर्धा २० ते ३० ऑक्टोबर या कालावधीत मलेशियात आयोजित होणार आहे. उरी येथे नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यात भारताचे १८ जवान ठार झाले होते. या पार्श्वभूमीवर या स्पर्धेत भारताने स्पर्धेत पाकविरुद्ध विजय मिळविण्याचा निर्धार केला आहे. चॅम्पियन्स स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभवाची नामुष्की ओढवत आपल्या जवानांना निराश करण्याची आमची इच्छा नाही. त्यामुळेच पाकिस्तानला पराभूत करण्याचा आम्ही दृढनिश्चय केला आहे. उभय देशांमधील सामन्यांबाबत चाहत्यांमध्ये कायमच खूप उत्सुकता असते. या सामन्यात आम्ही आमच्या क्षमतेइतकी शंभर टक्के कामगिरी करून दाखवू, असे भारतीय वरिष्ठ हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेशने सांगितले होते. भारत व पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.