Head Coach Graham Reid Resigned: भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिला आहे. ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या हॉकी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर रीडने आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याशिवाय विश्लेषणात्मक प्रशिक्षक ग्रेग क्लार्क आणि वैज्ञानिक सल्लागार मिचेल डेव्हिड पेम्बर्टन यांनीही राजीनामा दिला आहे. हॉकी विश्वचषकात भारतीय संघ नवव्या स्थानावर राहिला.
रीड यांची एप्रिल २०१९ मध्ये भारताच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या देखरेखीखाली भारताने २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले. ५८ वर्षीय ऑस्ट्रेलियन रीड यांनी भुवनेश्वरमध्ये विश्वचषक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जर्मनीने बेल्जियमचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला आणि संघ चॅम्पियन बनला. जर्मनीचे हे तिसरे विश्वचषक विजेतेपद ठरले.
विश्वचषकात अनेक यश, पण अपयश
राजीनामा दिल्यानंतर हे तिघेही पुढील महिनाभर नोटीस पिरियडमध्ये राहतील. ऑस्ट्रेलियासाठी हॉकी खेळणाऱ्या रीड आणि त्याच्या टीमसोबत भारताने ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले. याशिवाय, भारतीय संघाने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि FIH प्रो लीग २०२१-२२ हंगामात तिसरे स्थान मिळवले. रीड प्रशिक्षक असताना भारतीय संघाने २०१९ मध्ये FIH वर्ल्ड सिरीज फायनल जिंकली. यानंतर भुवनेश्वरमधील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा जिंकून तो टोकियो खेळांसाठी पात्र ठरला. रीडसह तिघांचेही राजीनामे स्वीकारताना हॉकी इंडियाचे अध्यक्ष टिर्की म्हणाले, “आम्हाला चांगले निकाल देणाऱ्या ग्रॅहम रीड आणि त्यांच्या संघाचे भारत नेहमीच ऋणी राहील. विशेषतः ऑलिम्पिक खेळांमध्ये. प्रत्येक प्रवासात नवे टप्पे येतात आणि आता आपल्यालाही संघासाठी नव्या विचाराने पुढे जायचे आहे.
राजीनामा जाहीर करताना रीड म्हणाले, “आता माझ्या पदावरून पायउतार होण्याची आणि पुढील व्यवस्थापनाकडे जबाबदारी सोपवण्याची वेळ आली आहे. संघ आणि हॉकी इंडियासोबत काम करणे हा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. या अद्भुत प्रवासातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद लुटला आहे. मी संघाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”
गट टप्प्यात संघाने स्पेनचा २-० असा पराभव केला, त्यानंतर इंग्लंडसोबत ०-० अशी बरोबरी साधली आणि शेवटच्या गट सामन्यात वेल्सचा ४-२ असा पराभव केला. यानंतर क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला क्रॉसओव्हर मॅचमध्ये न्यूझीलंडवर मात करावी लागली, पण आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाला तो सामना जिंकता आला नाही. न्यूझीलंडने पूर्ण वेळेत स्कोअर ३-३ वर आणला. त्यानंतर भारतीय संघ पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत झाला आणि उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. मात्र, क्लासिफिकेशन राउंडमध्ये भारतीय संघाची कामगिरी जबरदस्त होती. संघाने जपानला ८-० ने पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा ५-२ ने पराभव केला.