भारतीय संघाला विश्वचषक हॉकी स्पर्धेत नवव्या-दहाव्या क्रमांकासाठी शनिवारी दक्षिण कोरियाविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे. मात्र गेल्या वर्षी आशिया स्पर्धेत दक्षिण कोरियाकडून स्वीकारलेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.
भारताला गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेत कोरियाने ४-३ असे हरवले होते. त्यानंतर भारताने विश्वचषक स्पर्धेची पात्रता पूर्ण केली होती. माजी विजेत्या पाकिस्तानलाही या स्पर्धेत स्थान मिळवण्यात अपयश आले. भारताने या स्पर्धेत फारशी लक्षणीय कामगिरी केलेली नाही. कोरियात आणखी तीन महिन्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी आत्मविश्वास उंचावण्यासाठी भारत कोरियाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करेल, अशी आशा आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा ही आगामी ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा असल्यामुळे भारताचे लक्ष्य ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्याचे असेल.
भारत व कोरिया यांच्यातील सामन्याच्या निकालावरच आशियाई देशांचे मानांकन अवलंबून आहे. मलेशियाला बाराव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आशियाई देशांमध्ये त्यांचे तिसरे स्थान असेल.
‘‘वाईट कामगिरीकडे दुर्लक्ष करून आमचे खेळाडू कोरियाविरुद्ध विजय मिळविण्याच्याच जिद्दीने खेळणार आहेत, ’’ असे भारताचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी सांगितले