भुवनेश्वरमध्ये बुधवारपासून हॉकी विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वोत्तम 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मात्र यंदाच्या स्पर्धेसाठी परदेशी संघांनी खास तयारी केल्याचं दिसून येत आहे. जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड यासारख्या संघांनी यंदा खेळाडूंसोबत आचारी, आहारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांची फौज बाळगली आहे. काही महिन्यांपूर्वी भुवनेश्वरमध्ये झालेल्या वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेदरम्यान परदेशी संघाचे काही खेळाडू भारतीय वातावरणाशी जुळवून न घेता आल्यामुळे आजारी पडले होते.

अवश्य वाचा – Mens Hockey World Cup 2018 : सलामीच्या सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात

जर्मनी आणि इंग्लंडच्या संघाने यंदाच्या स्पर्धेसाठी विशेष काळजी घेतलेली आहे. इंग्लंडच्या संघाने आपल्या खेळाडूंसाठी हॉटेलमध्ये वेगळ्या किचनची व्यवस्था केली आहे. सर्व बाबतीमध्ये स्वच्छता बाळगली जावी यासाठी इंग्लंडच्या संघाने ही काळजी घेतली आहे. वर्ल्ड हॉकी लीग फायनल स्पर्धेदरम्यान जर्मनीचे सात तर इंग्लंडचे तीन खेळाडू आजारी पडले होते. या कारणांमुळे दोन्ही संघ जेतेपदाच्या शर्यतीमधून बाहेर फेकले गेले होते.

“ज्या-ज्या वेळी आम्ही भारतात खेळायला येतो, त्यावेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण प्रत्येक वेळा वातावरणाशी जुळवून घेणं आम्हाला जमत नाही. मात्र यंदा आम्ही डॉक्टर, आहारतज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांची एक स्वतंत्र टीम सोबत आणली आहे. आम्ही हॉटेलमधली अधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोललो आहेत, पण काही गोष्टी आमच्या हातात नाहीयेत. त्यामुळे आमचे आहारतज्ञ व इतर अधिकारी प्रत्येक दिवशी किचनमधली तयारी नजरेखालून घालतील.” परदेशी संघाच्या एका व्यवस्थापनाने इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली.

इंग्लंडच्या संघाने यंदा खबरदारीचा उपाय म्हणून, संघाचं खानपान सांभाळणाऱ्या आचारीवर्गाला पहिलेच भुवनेश्वरमध्ये पाठवलं होतं. इंग्लंड संघाच्या हॉटेलमध्ये स्वतंत्र किचनची व्यवस्था करण्यात आली असून संघासाठी बनवलं जाणारं जेवणं हे फक्त इंग्लंडचे आचारी बनवणार आहेत. इंग्लंडच्या संघाचे आहारतज्ञ अॅडम हॅलिडे यांनी माहिती दिली. त्यामुळे एकंदरीतचं परदेशी संघानी भारतातलं वातावरण व स्वच्छतेची चांगलीच धास्ती घेतल्याचं दिसून येतंय.