लंडन : दोन वर्षांनंतर होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा पार पाडण्यासाठी खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने राष्ट्रकुल २०२६ ग्लासगो संयोजन समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे.

या स्पर्धा रद्द होण्याच्या वाटेवर असतानाच ग्लासगो शहराने अगदी ऐनवेळेस या स्पर्धा घेण्याची तयारी दर्शवली. कमी खर्चात या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी संयोजन समितीने स्पर्धेतील नेहमीच्या १९ क्रीडा प्रकारांऐवजी स्पर्धा १० क्रीडा प्रकारात घेण्याचा निर्णय घेतला. संयोजन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत वगळण्यात आलेल्या खेळांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या खेळांसह टेबल टेनिस, स्क्वॉश आणि ट्रायथलॉन या खेळांवरही संयोजन समितीने फुली मारली आहे. त्याचबरोबर स्पर्धा केवळ चारच केंद्रांवर खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धा सुरळीत आणि यशस्वी तसेच आर्थिकदृष्ट्या यशस्वी पार पाडण्यासाठी आम्ही १० क्रीडा प्रकारातच स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेची ही २३वी आवृत्ती राहणार असून, स्पर्धा २३ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. ग्लासगो येथे १२ वर्षांनी ही स्पर्धा पार पडणार आहे.

हेही वाचा >>> Dilip Vengsarkar : दिलीप वेंगसकर ‘आर्मीत’ नसतानाही, त्यांचे सहकारी ‘कर्नल’ का म्हणायचे? जाणून घ्या

सर्वाधिक फटका भारताला

वगळलेल्या खेळांवर लक्ष टाकल्यास सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे. वगळण्यात आलेल्या प्रत्येक खेळात अखेरच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकांची कमाई केली होती. अपवाद फक्त नेमबाजीचा असेल. नेमबाजीला अखेरच्या बर्मिंगहॅम स्पर्धेपासूनच वगळण्यात आले आहे. हॉकी खेळात पुरुष, महिला मिळून भारताने आतापर्यंत एका सुवर्णपदकासह आठ, बॅडमिंटनमध्ये १० सुवर्ण, ८ रौप्य, १३ कांस्यपदके मिळविली आहेत. कुस्तीत आतापर्यंत भारताने या खेळात ११४ पदकांची कमाई केली आहे. क्रिकेटमध्येही भारताचे हक्काचे पदक मानले जाते. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात नेमबाजीत भारताने आतापर्यंत १३५ पदके मिळवली आहेत. विशेष म्हणजे, बर्मिंगहॅम स्पर्धेतही नेमबाजीला वगळण्यात आल्यानंतरही भारताने स्पर्धेत आजपर्यंतची सर्वाधिक पदके मिळविली होती. स्पर्धा आयोजनासाठी सार्वजनिक निधी उभारण्याची गरज भासणार नाही हे या स्पर्धेने सिद्ध होईल, असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने म्हटले आहे. या स्पर्धेसाठी राष्ट्रकुल क्रीडा महासंघ केवळ १० दशलक्ष पौंड रकमेची गुंतवणूक करेल आणि यातून ग्लासगो शहरासाठी १५० दशलक्षापेक्षा अधिक मूल्य जमा होईल, असा विश्वासही राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने व्यक्त केला आहे.

या खेळांचा समावेश

अॅथलेटिक्स, पॅरा अॅथलेटिक्स (ट्रॅक अँड फिल्ड), जलतरण, पॅरा जलतरण, कलात्मक जिम्नॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग, पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, पॅरा वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो, बाऊल्स, पॅरा बाऊल्स, ३ बाय ३ बास्केटबॉल, ३ बाय ३ व्हीलचेअर बास्केटबॉल.

३० पदकांचा पडणार फरक

नेमबाजीला वगळल्यानंतरही भारताने बर्मिंगहॅम २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत ६१ पदकांची कमाई केली होती. भारताने या स्पर्धेत १६ क्रीडा प्रकारांसाठी २१० खेळाडूंची निवड केली होती. यातील ३० पदके ही या वेळी वगळण्यात आलेल्या खेळामधून मिळालेली होती.

येथे होणार स्पर्धा

सर ख्रिास हॉय वेलोड्रम, स्कॉटस्टॉन मैदान, टोलक्रॉस आंतरराष्ट्रीय जलतरण संकुल आणि स्कॉटिश इव्हेंट कॅम्पस.

Story img Loader