सरदारा, रितू यांना एक लाखाचे बक्षीस
नवी दिल्ली : आशियाई हॉकी महासंघातर्फे सवरेत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक मिळविणारा सरदारा सिंग व सवरेत्कृष्ट युवा खेळाडूचे बक्षीस मिळविणारी रितू राणी या दोन्ही भारतीय खेळाडूंना हॉकी इंडियातर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरेंद्र बात्रा यांनी ही माहिती दिली.

पाकिस्तान हॉकी संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार असून तब्बल सात वर्षांनंतर या दोन पारंपरिक प्रतिस्पध्र्यामध्ये पाच सामन्यांची हॉकी मालिका होणार आहे. दोन्ही देशांमधील खेळांच्या मैदानावरील संबंध सुधारावेत, या उद्देशानेच ही मालिका होणार आहे.
२००८मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध विकोपाला गेले होते. मात्र केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवल्यामुळे डिसेंबर महिन्यात पाकिस्ताचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. मलेशियात गेल्या आठवडय़ात झालेल्या आशियाई हॉकी महासंघाच्या बैठकीदरम्यान हॉकी इंडिया आणि पाकिस्तान हॉकी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या दौऱ्याचे वेळापत्रक ठरवले. पाकिस्तान संघ ५ ते १५ एप्रिलदरम्यान भारतात होणाऱ्या मालिकेत रांची, जालंधर, नवी दिल्ली, लखनौ आणि मोहाली येथे सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ २३ एप्रिलपासून पाकिस्तानात लाहोर, फैसलाबाद, कराची आणि सियालकोट येथे पाकिस्तान संघाशी दोन हात करेल. संबंधित पुरस्कर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे पाकिस्तान हॉकी महासंघाच्या पत्रकात म्हटले आहे. मलेशिया येथे ९ ते १६ मार्चदरम्यान होणाऱ्या अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दरम्यान, भारताचा स्नूकर संघही कराचीला रवाना होणार असून ७ ते १० मार्चदरम्यान सामने खेळणार आहे.