scorecardresearch

भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार?; २०२५ च्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’बद्दल मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यावेळी…”

पाकिस्तानात २० वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा होणार असून आयसीसीने त्यांना यजमान पदाचा मान दिलाय.

2025 champions trophy
आयसीसीने केलेल्या घोषणेमध्ये पाकिस्तान यजनाम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जागतिक स्पर्धांची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. पुढील १० वर्षात जगभरामध्ये कुठे-कुठे आणि कोणत्या स्पर्धा भरवल्या जाणार याची माहिती आयसीसीने जाहीर केलीय. यामधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानमध्येही क्रिकेट स्पर्धांचं आयोजन होणार आहे. पाकिस्तानात २० वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा होणार असून २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवण्याची त्यांना संधी मिळणार आहे. पाकिस्तानला देण्यात आलेल्या या संधीनंतर त्याची भारतामध्येची चर्चा सुरु झालीय. दरम्यान केंद्रामध्ये सध्या सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारच्यावतीने या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाणार की नाही यासंदर्भात पहिल्यांदाच भाष्य करण्यात आलंय.

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भातील माहिती घेत असल्याचं म्हटलं आहे. अनुराग ठाकूर यांना भारतीय संघ २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी जाणार की नाही यासंदर्भात भाष्य केलं आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या राजकीय वादामुळे दोन्ही देश केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात. भारताने यापूर्वी क्रिकेट मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केल्याच्या घटनेला २० वर्षांहून अधिक काळ उलटला आहे.

नक्की वाचा >> ICC चा मोठा निर्णय : कुंबळेला ‘त्या’ पदावरुन काढून BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची केली नियुक्ती

अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पत्रकारांशी यासंदर्भात चर्चा करताना भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार की नाही हे ठरवण्यासाठी गृह मंत्रालयाची भूमिका फार महत्वाची असणार आहे, असं म्हटलंय. गृह मंत्रालयालाही या निर्णयामध्ये सहभागी करुन घेतलं जाणार असून बराच विचार विनियम केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे संकेत अनुराग ठाकूर यांनी दिलेत.

नक्की वाचा >> पाकिस्तानी संघाच्या ‘त्या’ कृतीमुळे बांगलादेशात नवा वाद; मालिका रद्द करुन पाकिस्तानी खेळाडूंना हकलवून देण्याची मागणी

“वेळ आल्यावर बघूयात काय करता येईल ते. गृह मंत्रालय यासंदर्भातील निर्णयामध्ये सहभागी असेल. सुरक्षेच्या कारणावरुन अनेक देशांनी पाकिस्तान दौऱ्यामधून माघार घेतलीय. त्यावेळी (२०२५ मध्ये) सुरक्षेचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार निर्णय घेऊ,” असं अनुराग ठाकूर म्हणालेत. यापूर्वी पाकिस्तानाने भारत आणि श्रीलंकेसह संयुक्तरीत्या १९९६चा एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला होता.

नक्की वाचा >> T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, “वॉर्नरला मालिकावीर पुरस्कार देण्याचा निर्णय अन्यायकारक, हा पुरस्कार तर…”

भारताला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ श्रीलंकेसह संयुक्तरीत्या २०२६ चा टी-२० विश्वचषक आणि बांगलादेशसह संयुक्तरीत्या २०३१ चा एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2021 at 17:11 IST

संबंधित बातम्या