वर्षांतल्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सायना नेहवाल तसेच अजय जयरामने हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र पी. व्ही. सिंधू आणि पारुपल्ली कश्यप यांचे आव्हान सलामीच्या फेरीतच संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी घसरण झालेल्या सायनाने इंडोनेशियाच्या बेलाट्रिक्स मनुपुट्टीवर २१-१४, २१-१६ अशी मात केली. दुसऱ्या फेरीत सायनाचा मुकाबला थायलंडच्या पॉर्नटिप बुरानप्रास्टुस्र्कशी होणार आहे. या लढतीत बेलाट्रिक्सच्या तुलनेत १४ स्मॅशच्या फटक्यांसह सायनाने वर्चस्व राखले. यावर्षी नवी दिल्लीत झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेतही सायनाने बेलाट्रिक्सला नमवले होते. पहिल्या गेममध्ये सायनाने ५-० अशी दमदार आघाडी घेतली. हीच आघाडी वाढवत नेत सायनाने पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सायनाने ६-३ अशी आघाडी घेतली. बेलाट्रिक्सने झुंजार खेळ करत १४-१४ अशी बरोबरी केली. मात्र त्यानंतर सायनाने सलग चार गुणांची कमाई करत आगेकूच केली. ही आघाडी बळकट करत सायनाने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
पुरुषांमध्ये अजय जयरामने व्हिएतनामच्या तिइन मिन्ह न्युगेनचा २१-७, २१-१२ असा धुव्वा उडवत विजयी आगेकूच केली. चीनच्या झेनमिंग वांगने पारुपल्ली कश्यपवर २१-१४, २१-१० असा विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ली चोंग वेईने भारताच्या उदयोन्मुख के. श्रीकांतवर २१-१८, २१-१४ अशी मात केली.
द्वितीय मानांकित थायलंडच्या रत्नाचोक इन्थॅनॉनने पी. व्ही. सिंधूला २१-१६, २१-१७ असे नमवले. सलामीच्या लढतीतच रत्नाचोकचे तगडे आव्हान सिंधूसमोर होते, मात्र हे आव्हान तिला पेलवले नाही.
पुरुष दुहेरीत मनू अत्री-सुमीत रेड्डी तसेच अक्षय देवलकर-प्रणव चोप्रा तसेच तरुण कोना-अश्विनी पोनप्पा जोडीलाही सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले.