Hong Kong Super Sixes, India vs UAE: हाँगकाँग सुपर सिक्सेस लीग २०२६ स्पर्धेत भारतीय संघाचा सुपरफ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. स्पर्धेतील दुसऱ्याच दिवशी भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्पर्धेतील पहिल्या दिवशी भारतीय संघाला पाकिस्तानकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर असं वाटलं होतं की, भारतीय संघ यूएईला पराभूत करून पुनरागमन करेल आणि सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करेल. पण भारतीय संघाला यूएईविरुद्ध झालेल्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
यूएईविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी बाद ९४ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना टी नटराजनने १४ चेंडूंमध्ये सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार मारले. टी नटराजन गोलंदाज असून त्याने चौकारांचा पाऊस पाडला. पण संघातील प्रमुख फलंदाज शशांक सिंग, कृणाल पंड्या आणि नितीश राणा पूर्णपणे फ्लॉप ठरले. तर राहुल त्रिपाठी ७ चेंडूंमध्ये २१ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या यूएईने एकही विकेट न गमावता धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि विजय मिळवला.
यूएईचा एकतर्फी विजय
यूएईला हा सामना जिंकण्यासाठी ९५ धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना यूएईने अवघ्या २६ चेंडूंमध्ये दिलेलं आव्हान पूर्ण केलं. हाँगकाँग सुपर सिक्सेसमध्ये एकेरी दुहेरी धावांपेक्षा चौकार आणि षटकार मारण्यावर अधिक भर दिला जातो. ६ षटकात ९५ धावा या खूप जास्त आहेत. पण हाँगकाँग सुपर सिक्सेसच्या फॉरमॅटनुसार ६ षटकांत ९५ धावा खूप कमी आहेत. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या खालिद शाहने १४ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ६ षटकांराच्या साहाय्याने ५२ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. तर अंश टंडने १२ चेंडूंमध्ये १२ चेंडूंमध्ये २ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ३९ धावांची खेळी केली.
पाकिस्तानकडून एकतर्फी पराभव
यूएईकडून पराभव होण्याआधी भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात फलंदाजी करताना शशांक सिंगची बॅट चांगलीच तळपली होती. शशांकने अवघ्या ११ चेंडूंमध्ये ४० धावांची खेळी केली. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ६ गडी बाद ८८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने ३.५ षटकांत आव्हान पूर्ण केलं आणि विजय मिळवला.
