हाँगकाँग सुपर सिक्सेस स्पर्धेत भारतीय संघाचा सुपरफ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धेतील बाऊल सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडकडून ३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात मार्टीन अँडरसनच्या नेतृ्त्वाखाली खेळत असलेल्या इंग्लंडने ६ षटकांत २ गडी बाद १२४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून राहुल त्रिपाठीने अवघ्या १२ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक झळकावल्यानंतर तो रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला होता. पण विकेट्स गेल्यामुळे त्याला पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी यावं लागलं. पण भारतीय संघ आव्हानापासून ३ धावा दूर राहिला.
इंग्लंडकडून फलंदाजी करताना मार्टीन अँडरसनने अवघ्या १३ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकारांच्या बळावर ५१ धावांची तुफानी खेळी केली. यासह एड बर्नार्डने १४ चेंडूंचा सामना करत ३५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर इंग्लंडने ६ षटकांअखेर २ गडी बाद १२४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. शशांक सिंगने ९ चेंडूंमध्ये १ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने २९ धावांची खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने १४ चेंडूंमध्ये २ चौकार आणि ७ षटकारांच्या साहाय्याने ५६ धावांची खेळी केली. शेवटी कृणाल पंड्याने २८ धावांची खेळी केली. पण भारतीय संघ विजयापासून ३ धावा दूर राहिला.
या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना अवघ्या ८८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने २३ चेंडूंमध्ये दिलेलं आव्हान पूर्ण केलं.
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघ पुनरामनग करेल असं वाटलं होतं, पण पुढच्याच सामन्यात भारतीय संघाला यूएईकडून पराभवाचा सामना करावा लागला. यूएईविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने ६ षटकांत ९४ धावा केल्या होत्या. पण भारतीय गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करू शकले नाहीत. यूएईने एकही विकेट न गमावता २६ चेंडूंमध्ये दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
