अभिषेक एबी

२००३ वर्ल्डकपमधला एका फोटोबाबत फारशी चर्चा होत नाही. डरबान इथे ६ विकेट्स पटकावल्यानंतरचा तो फोटो नाही. तो स्पेल टाकल्यानंतर थोड्या वेळानंतर घेतलेला फोटो. नेहरा बाऊंड्रीजवळ खाली वाकला आहे. हात गुडघ्यावर आहेत. थकला आहे. काही मिनिटांपूर्वी नॉशिया टाळण्यासाठी त्याने केळं खाल्लं आहे. क्षणार्धात तो उलटी करतो, मैदानातच. हजारो चाहते पाहत असतात. टेलिव्हिजन कॅमेरेही हे दृश्य टिपतात. तो स्वत:ला सावरतो.

तो प्रसंग किती कठीण असेल ते आपण समजू शकतो. तुम्ही दुखापतग्रस्त असतानाही कारकिर्दीतला सर्वोत्तम असा स्पेल टाकला आहे. पण तो स्पेल होत नाही तोवर शरीराने तुमची साथ सोडली आहे. त्या खेळाडूचं नाव आहे- आशिष नेहरा. कारकिर्दीत नेहरा जितकं भारतासाठी खेळला त्यापेक्षा कैक जास्त दुखापतींमुळे खेळू शकला नाही. शरीर सातत्याने साथ सोडत असतानाही नेहरा विजीगीषु वृत्ती जागवत संघासाठी खेळत असे. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स कार्यक्रमात गौरव कपूरला दिलेल्या मुलाखतीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने नेहराच्या या मनोवृत्तीचं कौतुक केलं होतं. त्याची वेदना सोसण्याची क्षमता विलक्षण आहे. शरीर दुखापतींनी जर्जर होऊनही तो खचून जात नाही, खेळण्यासाठी तय्यार होतो.

१८ वर्ष नेहरा दुखऱ्या शरीराला तोंड देत खेळत राहिला. सात कर्णधारांच्या नेतृत्वात खेळला. टेस्ट,वनडे, टी२० सगळं खेळला. या काळात १२ शस्त्रक्रियांना तो सामोरं गेला. त्याचे संघातले सहकारी त्याला ‘मिस्टर ग्लास’ म्हणत असत. काच जशी संवेदनशील असते तसं नेहराचं शरीर होतं. कधीही साथ सोडायचं पण नेहरा खेळत राहायचा.

निवृत्ती स्वीकारल्यानंतर दिल्लीकर नेहराने गोव्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्याने क्रिकेट अकादमी सुरू केल्या. दिल्लीत हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा तो भाग आहे. आयपीएल स्पर्धेतील गुजरात टायटन्स संघाचा तो मुख्य प्रशिक्षक आहे. वर्षाला ३.५ कोटी रुपये त्याचं प्रशिक्षक म्हणून मानधन आहे.

आणि हे सगळं असलं तरी आजही तो तो बेसिक फोन वापरतो. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि नेहराचा मित्र रोहित शर्मा गंमतीत म्हणतो की सोशल मीडियावर आशिष नेहराचा ट्रेंड असतो पण तो स्वत: यातलं काहीही पाहू शकत नाही कारण तो तिथे नाहीयेच. नेहरा इन्स्टाग्रामवर नाही. ट्वीटर (एक्स), फेसबुकवर नाही. सोशल मीडियावरच नाही. २०२६ मध्ये असा माणूस असू शकतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही पण नेहरा सगळ्याला अपवाद आहे. तो अवलिया आहे.

दिल्लीच्या सदर बाजार परिसरात लहानाचा मोठा झालेला नेहरा वीरेंद्र सेहवागच्या स्कूटरवर मागे बसून सरावाला जायचा. नेहराची गोष्ट प्रेरणादायी आणि त्याचवेळी अचंबित करू शकते. नेहराचे बाबा दिल्ली सिव्हिल सप्लाईज कॉपोर्रेशनमध्ये काम करायचे. आई संस्कृत शिक्षिका. मध्यमवर्गीय कुटुंब. क्रिकेट खेळणं शक्य होतं पण कायमच खेळत राहता येईल याची शाश्वती नव्हती.

सोनेट क्रिकेट क्लबमध्ये तो पोहोचला. तारक सिन्हा ज्यांना आता ‘उस्तादजी’ म्हटलं जातं त्यांनी या उंचपुऱ्या वेगवान गोलंदाजाला पाहिलं. त्यांनी नेहराचा रनअप कमी केला. अधिक घोटीव केला. त्याच्या शरीरावर ताण येऊ नये असा केला. तारक यांच्या सूचनांमुळे आशिष खेळू शकला. चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग करण्यात आशिष माहीर होता. अशाच एका स्पेलने २००३ वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली होती.

जाताना सेहवाग स्कूटर चालवत असे, येताना नेहरा. पुढे जाऊन दोघेही टीम इंडियाचा भाग झाले. सेहवागने जगभरातील नामवंत गोलंदाजांचा समाचार घेतला. नेहराने शरीराला टक्कर देत गोलंदाजी केली. नेहराने त्याआधी १९९७-९८ मध्ये हरयाणाविरुद्ध पदार्पण केलं होतं. दोन्ही डावात त्याने अजय जडेजाला बाद केलं होतं. जडेजा तेव्हा भारतीय संघात होता. नेहरा वयोगट स्पर्धाही खेळला नव्हता. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या फलंदाजाला बाद करण्याचं कौशल्य नेहराकडे होतं.

२६ फेब्रुवारी २०२३. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यापूर्वी दोन दिवस नेहराच्या घोट्याला दुखापत झाली. इंग्लंडविरुद्ध खेळणं शक्य नाही असं वैद्यकीय चमूने सांगितलं. नेहराने मात्र मी खेळेन असं कर्णधार गांगुलीला सांगितलं. त्याने फिजिओंना दोन्ही दिवस माझ्याबरोबर थांबा असं सांगितलं. दोन दिवस त्याचा पाय बर्फाने शेकण्यात आला. तो धड झोपलाही नाही. पण इंग्लंडविरुद्ध तो खेळायला उतरला आणि त्याने धमाल उडवून दिली. त्याने २३ धावांत ६ विकेट्स पटकावल्या. अनेक वर्ष वर्ल्डकपमधलं भारतीय गोलंदाजांचे ते सर्वोत्तम प्रदर्शन होतं. २०२३ मध्ये मोहम्मद शमीने तो विक्रम मोडला.

त्या दुखापतीमुळे नेहराची चार वर्ष वाया गेली. तेवढ्या काळात जग पुढे जातं. अनेक नवे खेळाडू समोर येतात. नेहराने वाट पाहिली. त्याने खेळणं सोडलं नाही. २०११ वर्ल्डकप. पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्याने ३३ धावांत २ विकेट्स पटकावल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या षटकात १६ धावा दिल्यामुळे क्वार्टर फायनलच्या लढतीतून त्याला वगळण्यात आलं होतं. पाकिस्तानविरुद्ध त्याने त्याचं कौशल्य दाखवून दिलं. पण क्षेत्ररक्षण करताना त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झालं. त्याचा वर्ल्डकप तिथेच संपला. धोनीचा श्रीलंकेविरुद्धचा उत्तुंग षटकार त्याने ड्रेसिंगरुमधून पाहिला. तो संघाचा अविभाज्य भाग होता.

गुजरात टायटन्स संघाचा प्रशिक्षक झाल्यावर तो खेळाडूंचा सांगतो, फक्त अकरा नव्हे- संघातला प्रत्येक खेळाडू महत्त्वाचा आहे. प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे.

२०१६- शेवटची वनडे खेळल्याला पाच वर्षानंतर ३६व्या वर्षी नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स साठी खेळताना चांगली कामगिरी केल्यामुळे निवडसमितीने नेहराचा राष्ट्रीय संघासाठी विचार केला. नेहराने टी२० वर्ल्डकप खेळला. भारताचा तो सर्वोत्तम गोलंदाज होता. आयसीसीने जाहीर केलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम अकरामध्ये त्याचं नाव होतं ३६व्या वर्षी.

त्याच वर्षी नेहराला चिकनगुनिया झाला. भयंकर वेदनादायी होतं असं त्याने सांगितलं. १२ शस्त्रक्रियांचा सामना केलेला माणूस भयंकर वेदनादायी म्हणतो यातच सगळं आलं. पाठ, गुडघा. हाताचं बोट, मांडीचे स्नायू. यादी वाढती आहे. दुखापती शरीराचा भाग नाहीयेत, दुखापतींमधून उरलंय ते माझं शरीर आहे असं नेहरा गंमतीत म्हणत असे. तिशी ओलांडल्यानंतर नेहरा १४०च्या वेगाने गोलंदाजी करत असे. त्याने ट्रेनरचं ऐकणं सोडलं. योग करू लागला. स्वत:च्या शरीराचे ताणेबाणे समजून घेतले.

उस्तादजींसाठी घेतलं घर

तारक सिन्हा ज्यांनी नेहराच्या अ‍ॅक्शनवर काम केलं ते कठीण प्रसंगातून जात होते. घर रिकामं करण्याची नोटीस जागा मालकाने दिली. त्यांना राहायला घर नव्हतं. नेहराने व्यवस्था केली. किल्ली उस्तादजींच्या हातात दिल्या. कुठलंही प्रेस रिलीज नाही. इन्स्टाग्राम पोस्ट नाही. विराट कोहलीच्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख येतो. नेहरा असा माणूस आहे, प्रसिद्धीपासून दूर. त्याची कारकीर्द घडवणाऱ्या माणसासाठी त्याने पैसे खर्च केले. याच भावनेने २००५ मध्ये खराब क्षेत्ररक्षणासाठी तो धोनीवर खेकसला होता. याच भावनेने त्याने २००२ साली फ्लिनटॉफला लॉर्ड्स अर्थात क्रिकेटच्या पंढरीत षटकार लगावला होता. संपूर्ण संघ हास्यकल्लोळात फुटला होता.

याच भावनेने त्याने शेन बॉन्डला हॅमिल्टन इथे षटकार चोपला होता. खेळाबाबत तो अतिशय गंभीर असे. स्वत:ला तो फार गांभीर्याने घेत नसे. हे संतुलन चकित करणारं होतं. आता आशिष नेहराची उद्यमशील बाजू समजून घेऊया. आशिष नेहरा क्रिकेट अकादमी हा दिल्लीतल्या लब्धप्रतिष्ठितांच्या मुलांकरता काढलेला उपक्रम नाही. ठोस विचारांची बिझनेस स्ट्रॅटेजी त्यामागे आहे. या अकादमीचा बेस नोएडात आहे. इंडस व्हॅली पब्लिक स्कूलशी टायअप आहे. फी ४५०० ते ५२०० प्रति महिना अशीच आहे. उत्तर प्रदेशातील निमशहरं, महानगरं होऊ पाहणाऱ्या शहरातली मुलं हे उद्दिष्ट आहे. रठ, प्रयागराज, गोरखपूर, महोबा. या शहरांमध्ये चांगली प्रशिक्षण केंद्रं उपलब्ध नाहीत. या शहरांमध्ये फी १६०० ते २८०० प्रति महिना अशी आहे.

दक्षिण दिल्ली हे नेहराचं उद्दिष्ट नाही. तिथे प्रशिक्षकाला ५०,००० मानधन देऊ शकणारे आईवडील आहेत. तो अशा शहरांमध्ये अकादमी सुरू करतो जिथे चांगल्या प्रशिक्षणाची वानवा आहे. त्याच्या सल्लागार मंडळावर कोण आहे- झहीर खान, अजय जडेजा, अजित आगरकर. स्थानिक पातळीवरच्या मुलांना दर्जेदार प्रशिक्षण. भविष्याचा विचार.

दिल्लीत हॉटेल व्यवसाय

हॉस्पिटॅलिटी व्यवसाय नेहराचा भाऊ बघतो. माइंड करी हॉस्पिटॅलिटी. मिआ बेला हा युरोपियन स्टाईल गॅस्ट्रो पब हौज खास भागात आहे. दिल्लीतल्या डिप्लोमॅटिक वर्गासाठी शेंझेन हा कॉन्टिनेंटल डायनिंग ब्रँड आहे. मालचा मार्गावर हे आहे. जनपथ ग्रिल हाऊस इथे लाईव्ह बार्बेक्यूची व्यवस्था आहे. ऑफिस ऑफिस ही को वर्किंग स्पेस आहे. पुणे, मुंबई, बंगळुरूत ब्रँचेस आहेत. २०२० पर्यंत १०० कोटींचं लक्ष्य समूहाने ठेवलं होतं. याकरता ७० कोटींची गुंतवणूक केली होती. मायक्रो ब्रूअरीज कार्टून थीम असलेलं याब्डोबाडो आणि स्कूबी बार सुरू करण्यात आलं. आयपीएल हंगामादरम्यान या सर्व ठिकाणी आयपीएल डिनर आयोजित करण्यात येतात आणि नेहराची सही असलेले मर्चंडाईज दिले जातात. क्रिकेट आणि हॉस्पिटॅलिटी यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. स्मार्ट बिझनेस यालाच म्हणत असावेत.

सोशल मीडिया नसणं हाच झाला युएसपी

कोणत्याही उद्योगसमूहासाठी सोशल मीडिया हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. नेहरा या बाबतीत वेगळा आहे. सोशल मीडियावर नसल्यामुळे त्याच्या ब्रँडला फटका बसत नाही. उलट फायदाच होतो. प्रत्येक क्रिकेटपटू वर्कआऊटचे व्हीडिओ आणि कोलॅब करतो. नेहराचं नसणं खास ठरतं. त्याला अधिक विश्वासार्ह ठरवतं. त्याची किंमत वाढते. विश्वासार्हतेसाठी ब्रँड पैसे देतात. प्रिया बिस्किट ब्रँड नेहराला एका जाहिरातीसाठी एक कोटी रुपये मानधन देतात. ब्रँड मॅनेजरने म्हणतात तसं नेहराचं वेगळेपण हीच जमेची बाजू ठरते. कारण तो उठसूट सगळीकडे नसतो.

माय ११ सर्कलचाही तो सदिच्छादूत होता. २०२३ मध्ये कॉमेंट्रीच्या माध्यमातून नेहराने १.६ कोटी रुपयांची कमाई केली. गुजरात टायटन्सचं प्रशिक्षकपदासाठी दरवर्षी त्याला साडेतीन कोटी रुपये मिळतात. बाकी एन्डोर्समेंटमधून मिळणारं मानधन वेगळं. पाच विविध ठिकाणी सुरू असलेल्या अकादमींच्या माध्यमातून पैसा मिळतो. हॉस्पिटॅलिटी व्हेंचर हे भाऊ चालवत असला तरी त्याच्या नावावर ते चालतं. ७१ कोटी होतात. फायन्नाशियल एक्स्प्रेस स्वतंत्रपणे कमाईच्या या आकडेवारीची पुष्टी करत नाही.

लॅपटॉप न वापरणारा प्रशिक्षक

आयपीएल कोचिंग हे कॉर्पोरेट पद्धतीने चालतं. पीपीटी, डेटा हे सगळे शब्द परवलीचे आहेत पण नेहरा साधा लॅपटॉप देखील वापरत नाही.गुजरात हा नवा संघ आहे. मोठा चाहता वर्ग नाही. परंपरा नाही. अशा संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारणंही धाडसी निर्णय आहे. नेहरा फुटबॉल मॅनेजरप्रमाणे कार्यरत असतो. बाऊंड्रीजवळ उभं राहून तो सूचना देत असतो. तिथल्या खेळाडूशी बोलत असतो. पदार्पणाच्या हंगामातच जेतेपद पटकावण्याची किमया करणारा हा संघ आहे. साई सुदर्शन धावांसाठी संघर्ष करत होता- नेहरा ठामपणे त्याच्या मागे उभा राहिला. गुजरात हा गोलंदाजांवर लक्ष केंद्रित करणारा संघ आहे. तु्म्ही जसे आहात तसे राहा. आपापल्या भूमिकेबद्दल स्पष्टता बाळगा. हारजीत खेळाचा भाग आहे पण तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न करायला हवेत. चार हंगामांपैकी तीनमध्ये या संघाने प्लेऑफ्स गाठलं आहे. एकदा जेतेपद पटकावलं आहे. बिनधास्त बेडरपणे खेळणारा संघ आहे. ही नेहराची पद्धत आहे.

आशिष नेहराची कारकीर्द प्रदीर्घ अशी नाही. दैदिप्यमान अशी नाही. त्यात खाचखळगे खूप. वर्ल्डकप फायनल दुखापतीमुळे खेळू शकला नाही पण पहिल्याच हंगामात प्रशिक्षक म्हणून संघाला जेतेपद पटकावून दिलं. पुनरागमन करत राहिला. १२ शस्त्रक्रिया, डरबानच्या मैदानावरची उलटी. कशानेच तो खचून गेला नाही.

संपादकीय तळटीप

हे एक स्वतंत्र स्वरुपाचं प्रोफाईल आहे. लेखासंदर्भात आशिष नेहरा आणि त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांची थेट प्रतिक्रिया उपलब्ध नसल्याने सार्वजनिक जीवनात उपलब्ध असलेली माहिती आणि रेग्युलेटरी फायलिंग्जच्या आधारे हा वृत्तलेख लिहिण्यात आला आहे. ‘फायन्नॅशियल एक्स्प्रेस डॉट कॉम’च्या संपादकीय नियमावलीला अनुसरून हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.