Afghanistan Super-8s Qualification Scenario in T20 WC 2026: अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० विश्वचषक इतिहासातील थरारक सामना खेळवला गेला. या सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या आणि अखेरच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागला. दोन्ही संघांनी अखेरच्या चेंडूपर्यंत कडवी झुंज दिली. गट टप्प्यातील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी हा सामना निर्णायक होता. आता अफगाणिस्तानला सुपर-८ गाठण्यासाठी काय करावं लागणार, जाणून घ्या.
१८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात जबरदस्त झाली. रहमानुल्लाह गुरबाजच्या आक्रमक फलंदाजीमुळे संघाने अवघ्या चार षटकांत ५० धावांचा आकडा गाठला. मात्र, इब्राहिम झाद्रान, गुलबदिन नायब आणि सेदिकुल्लाह अटल यांना झटपट बाद करत दक्षिण आफ्रिकेने सामन्यात दमदार पुनरागमन केलं. तरीही गुरबाजने आपली फटकेबाजी कायम ठेवत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली सर्वोच्च ८४ धावांची खेळी साकारली. पण केशव महाराजने त्याला बाद केलं आणि पुढच्याच चेंडूवर दारविश रसूली धावबाद झाला, त्यामुळे सामन्यावर दक्षिण आफ्रिकेने नियंत्रण मिळवले.
रशीद खानने झटपट धावा करत सामना रंगतदार बनवला, तर नूर अहमदने १९व्या आणि २०व्या षटकात प्रत्येकी एक षटकार ठोकत सामना बरोबरीत आणला. शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सामना जवळपास संपला होता, पण कागिसो रबाडाने नो-बॉल टाकला आणि त्यानंतर आणखी एक नो-बॉल दिला, ज्याचा फायदा नूर अहमदने घेतला. मात्र, रबाडाने अप्रतिम धावबाद करत पुन्हा सामना बरोबरीत आणला.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने १८ धावा केल्या, पण ट्रिस्टन स्टब्सने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत पुन्हा सामना टाय केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने सुपर ओव्हरमध्ये २३ धावा केल्या, ज्या अफगाणिस्तानपेक्षा सहा धावांनी अधिक होत्या. दक्षिण आफ्रिकेला ४ चेंडूंमध्ये २४ धावांची गरज असताना गुरबाजने सलग तीन षटकार ठोकले, पण शेवटच्या चेंडूवर विकेट गेल्याने अखेर दक्षिण आफ्रिकेने रोमांचक विजय मिळवला.
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत फलकावर भक्कम धावसंख्या उभारली होती. एडन मारक्रम लवकर बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉक आणि रायन रिकल्टन यांनी वादळी अर्धशतकं झळकावत संघाला मजबूत स्थितीत आणलं, दरम्यान या दोघांनी शतकी भागीदारी रचली, मात्र रशीद खानच्या एकाच षटकात दोघे बाद झाल्याने अफगाणिस्तानला पुनरागमनाची संधी मिळाली. डेवाल्ड ब्रेव्हिस आणि डेव्हिड मिलर यांना अपेक्षित वेगाने धावा करता आल्या नाहीत, त्यामुळे २०० पार जाणार वाटणारी धावसंख्या अखेरीस १८७ धावांवर अफगाणिस्तानने रोखली होती.
अफगाणिस्तान सुपर-८ साठी कसा पात्र ठरू शकतो?
टी-२० विश्वचषक २०२६ मधील अफगाणिस्तानचा हा दुसरा पराभव होता आणि सुपर-८ मध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या ते अजूनही पात्र ठरू शकतात, पण त्यासाठी अनेक गोष्टी त्यांच्या बाजूने घडणं आवश्यक आहे. अफगाणिस्तानला यूएई आणि कॅनडा विरुद्धचे सामने जिंकून चार गुण मिळवावे लागतील. त्यानंतर दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील विजेत्याला यूएई किंवा कॅनडा यापैकी एखाद्या संघाने पराभूत करणं गरजेचं असेल.
त्यामुले अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे तिन्ही संघ समान गुणांवर असतील आणि गटातील अव्वल दोन संघ पुढील फेरीत जातील. एखादा असोसिएट संघही चार गुणांवर पोहोचू शकतो, परंतु त्यांचा कमी नेट रन रेट त्यांना अव्वल संघांपेक्षा पुढे जाऊ देणार नाही.
