आशियाई क्रीडा स्पर्धा या स्पर्धेच्या नावानुसार आशियाई उपखंडात राहणारे खेळाडू या स्पर्धेत खेळू शकतात. बहरीनने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ८ सुवर्णपदकांवर नाव कोरलं पण त्यांचे खेळाडू कुठले आहेत हे तुम्ही पाहिलंत तर तुम्हाला धक्का बसेल.
मिखाइल अरखगेलसकी- रशियात जन्म
बिऱ्हानू बालेव- इथिओपियात जन्म
शिटाये हाबटे- इथिओपियात जन्म
विनफ्रेड यावी- केनियात जन्म
नेली कोरीर- केनियात जन्म
सलवा एद नासेर- नायजेरियात जन्म
आयेशा अब्दुल्ला- जन्मस्थळ माहिती नाही
अल्ला सामी- जन्मस्थळ माहिती नाही.
हे सगळे खेळाडू बहरीनचे आहेत आणि त्यांनी बहरीनसाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक पटकावलं आहे. आश्चर्य वाटतंय ना- पण हे खरं आहे. आफ्रिकेतील देशांमध्ये जन्मलेले खेळाडू बहरीनसाठी खेळत आहेत. आफ्रिकेची पार्श्वभूमी असलेले खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१४ मध्ये झालेल्या स्पर्धेत आफ्रिकेच्या खेळाडूंनी जिंकलेल्या पदकांची १४ होती. २०१८ मध्ये ती १६ झाली. भारतीय खेळाडूंसाठी हे मोठं आव्हान ठरलं आहे. आफ्रिकेचे खेळाडू अतिशय काटक असतात. अॅथलेटिक्स प्रकारात त्यांची कामगिरी नेहमीच चांगली होती. आफ्रिकेचे खेळाडू बहरीनच्या माध्यमातून खेळत असल्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी पदकाचा मार्ग आणखीनच खडतर झाला आहे.
१०००० मीटर पुरुषांच्या शर्यतीत भारताच्या गुलवीर सिंगने रौप्यपदकाची कमाई केली. यामध्ये इथिओपियात जन्म झालेल्या बिऱ्हानू बालेवने सुवर्णपदकाची कमाई केली. आशियाई पातळीवर अव्वल स्पर्धकांमध्ये गणना होणार गुलवीर शर्यतीदरम्यान आघाडीवर होता. सुवर्णपदक पक्कं होणार असं चित्र असताना बिऱ्हानूने शेवटच्या क्षणांमध्ये बाजी मारली. आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या पदकावर परिणाम होतो असं नाही तर एकूण आकडेवारीतही ते दिसतं.
महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये परुल चौधरी ही एकच आशियाई खेळाडू होती. अन्य चारपैकी काही बहरीनचे तर काही कझाकिस्तानचे होते. २०१८ मध्येही भारताला फटका बसला होता. १०० मीटर आणि २०० मीटर तसंच ४०० मीटर प्रकारात नायजेरियाच्या एडिओंग ओडिंग आणि साल्व्हा नासेर यांनी सुवर्णपदकावर कब्जा केला होता.
इथिओपिया, केनिया, नायजेरिया, सुदान या देशातल्या खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेचं रुपडंच पालटलं आहे. कतार आणि बहरीन या देशांना या संक्रमणाचा तगडा फायदा मिळाला आहे. कझाकिस्तानही आता लाभार्थींमध्ये सामील झाला आहे.
१९९२ मध्ये बार्सिलोना इथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सोमालियात जन्म झालेल्या मोहम्मद सुलेमानने कतारला १५०० मीटर शर्यतीत पदक जिंकून दिलं होतं. याची प्रामुख्याने सुरुवात २००६ दोहा इथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत झाली. केनियात जन्मलेल्या अॅथलिट्सनी पुरुषांच्या ८०० मीटर, १५०० मीटर, ५०००मीटर, १०,०००मीटर तसंच ३०००मीटर स्टीपलचेस आणि मॅरेथॉन शर्यतीत कतार आणि बहरीनसाठी पदकं पटकावलं होतं. तेव्हापासून हा ट्रेंड रूढ झाला. २०१२ते २०१६ या कालावधीत बहरीनने केनियाचे १८, इथिओपियाचे १७, मोरोक्कोचे ५ आणि नायजेरियाच्या दोन खेळाडूंना ताफ्यात सामील केलं.
२०१० मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बहरीनने अॅथलेटिक्समध्ये ९ पदकं जिंकली होती. २०१४ मध्ये इन्चॉन इथे झालेल्या स्पर्धेत १९ (९ सुवर्ण), जाकार्ता मध्ये झालेल्या स्पर्धेत २६ (१२ सुवर्ण) आणि २०२३ मध्ये हांगझाऊ इथे झालेल्या स्पर्धेत १६ (१० सुवर्ण) अशी बहरीनची कामगिरी अमूलाग्र बदलली.
उत्तम पैसा, चांगली जीवनशैली आणि अव्वल अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची हमी या गोष्टींच्या बळावर आखातातील देश आफ्रिकेतील खेळाडूंना आपल्याकडे खेचून घेत आहेत. बिऱ्हानू बालेवच्या कुटुंबाची काळजी घेतली जाते. बहरीन आणि इथिओपिया अशा दोन्ही देशांसाठी तो खेळत असतो.
बहरीनसाठी खेळू लागल्यावर माझं आयुष्यच बदललं. कोरोला ही महागडी गाडी माझ्याकडे आहे. मी नवीन घर घेतलं आहे. मी इथिओपियात सराव करतो. पण मला बहरीनही आवडतं. घरचे इथिओपिया आणि बहरीन असे जा ये करतात असं बालेवने आशियाई क्रीडा स्पर्धेत पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
पैशाच्या बळावर मूळ देशाची साथ सोडून हे खेळाडू आखाती देशांसाठी खेळत असल्याचं लक्षात येताच जागतिक अॅथलेटिक्स महासंघाने फेब्रुवारी २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीत अशा ट्रान्सफरवर बंदी घातली. २०१८ मध्ये नव्या सुधारणांची घोषणा झाली त्यानंतर पु्न्हा ट्रान्सफररुपी संक्रमण सुरू झालं.
आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाचे आफ्रिकेचे प्रतिनिधी हमाद कालकाबा मालबौम यांनी खेळाडू पैशासाठी देशाची साथ सोडत असल्याच्या निर्णयावर टीका केली. जो जास्त पैसा देतो तिथे आफ्रिकेचे खेळाडू जातात हे उघड समीकरण आहे. नव्या नियमानुसार तीन वर्षांचा वेटिंग कालावधी आणि खेळाडू २० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असावा अशी अट ठेवण्यात आली आहे.
कठोर नियम असूनही जागतिक अॅथलेटिक्स महासंघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकविजेता रोजे स्टोना (जमैका), जागतिक विक्रम नावावर असणारा ब्रिजिड कोसेगी (केनिया), शॉट पूटर राजिंद्र कॅम्पबेल (जमैका), लॉन्ग जंपर वेन पिनॉक (जमैका), स्प्रिंटर फेव्हर ऑफी (नायजेरिया) यांच्या तुर्कीयेला ट्रान्सफर होण्याच्या प्रक्रियेला रोखण्यात आलं. तुर्कीये सरकारच्या सहकार्याने आफ्रिकेच्या खेळाडूंना ताफ्यात घेण्याचा हा प्रकार असल्याचं महासंघाने म्हटलं होतं.
आफ्रिकेचे खेळाडू आशियाई स्पर्धेत सहभागी होत असल्याने पदकासाठीची चुरस आणखी तीव्र झाली आहे. प्रत्येक खेळाडू पदकासाठी जीवापाड मेहनत घेत असतो. चार वर्षातून एकदाच आशियाई पातळीवर कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते. आफ्रिकेचे खेळाडू आखाती देशांच्या माध्यमातून खेळत असल्यामुळे पदक मिळवणं खडतर झालं आहे. त्याचवेळी आशियाई उपखंडातील खेळाडूंची पदकसंख्या घटली आहे. हे चूक की बरोबर याबद्दल चर्चा सुरू राहील. पण आशियाई उपखंडातील खेळाडूंना अन्य खंडातल्या खेळाडूंबरोबर स्पर्धा करावी लागत आहे हे सत्य आहे.
