ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणजे टेनिसविश्वातला मानाचं पान. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि युएस ओपन अशा चार ग्रँडस्लॅम स्पर्धा वर्षभरात होतात. काही दिवसांपूर्वीच जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने युएस ओपन स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. झ्वेरेवचं हे दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. डायबेटिससारख्या आजारावर मात करत झ्वेरेवने हे जेतेपद पटकावल्याने त्याचं विशेष कौतुक आहे.
युएस ओपनच्या फायनलमध्ये त्याने अमेरिकेच्या बेन शेल्टॉनला नमवलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. फायनलदरम्यान त्याच्या रुटीनमुळे मात्र चाहते बुचकळ्यात पडले आहेत. आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेच्या नियमानुसार, सामना सुरू असताना खेळाडूंना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करता येत नाही. कोच किंवा सपोर्ट स्टाफशी संपर्क किंवा बुकी किंवा सामन्यात बाधा आणू शकेल अशा कोणत्याही व्यक्तीशी संपर्क करता येत नाही. त्यामुळे अशी परवानगी नसते. मात्र विशेष अपवादात्मक परिस्थितीत वैद्यकीय उपचारांचा भाग याअंतर्गत अशा डिव्हाईसला परवानगी देण्यात येते.
युएस ओपनच्या फायनलदरम्यान झ्वेरेव चेंजओव्हर म्हणजे विश्रांती काळात मोबाईल फोन चेक करत असल्याचं दिसलं होतं. पण हा मोबाईल नाही. कोचिंग किंवा अन्य कोणत्याही कम्युनिकेशनसाठी झ्वरेव्ह हे डिव्हाईस वापरत नाही. वयाच्या चौथ्या वर्षी झ्वेरेवला डायबेटिस असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. टाईप१ असा त्याचा प्रकार होता. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सामन्यादरम्यान रक्तातली साखरेची पातळी कमी जास्त झाली तर पाहण्यासाठी तो डिव्हाईस वापरतो.
झ्वेरेवने पहिले दोन सेट जिंकले. विश्रांती काळात या डिव्हाईसच्या माध्यमातून साखरेची पातळी किती ते तपासलं. झ्वेरेव सामन्यादरम्यान फोन बाळगतो पण त्यात सिम कार्ड नसतं. कोणतीही सेल्युलर सर्व्हिस कार्यान्वित नसते. ब्ल्यूटूथच्या माध्यमातून हे डिव्हाईस कनेक्ट होतं आणि कंटिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरला जोडलेलं असतं.
फोनमध्ये त्याच्या रक्तातली साखरेची पातळी दिसते. टेनिससारख्या दमवणाऱ्या खेळात प्रचंड ऊर्जा खर्ची पडते. साखरेची पातळी कमी झाल्यास झ्वरेव्हला तातडीने उपचार घ्यावे लागतात. पारंपरिक पद्धतीनुसार फिंगर प्रिक टेस्टद्वारे साखरेची पातळी समजू शकते. पण ते सगळं करण्याएवढा वेळ झ्वेरेवकडे नसतो. या डिव्हाईसच्या माध्यमातून ते काम सुकर होतं. झ्वेरेवच्या किटमध्ये इन्शुलिन पेनही असतं. त्याच्या साखरेची पातळी अचानक उंचावली तर तो इन्शुलिन घेतो.
झ्वेरेवने यासंदर्भात बोलताना सांगितलं की, ग्रँडस्लॅम स्पर्धेची मॅच आणि हे म्हणजे दोन सामने खेळण्यासारखं आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूला टक्कर देणं हे आव्हानात्मक असतं. त्याचवेळी माझा स्वत:च्या शरीराशी संघर्ष सुरू असतो. प्रचंड दमवणाऱ्या सामन्यादरम्यान साखरेची पातळी नियंत्रित राखणं हेही तितकंच आव्हानात्मक आहे. पातळी वर खाली झाल्यास मला उपचारही घ्यावे लागतात’.
लहानपणी डॉक्टरांनी डायबेटिसचं निदान केलं तेव्हा झ्वेरेवला कोणताही खेळ खेळता येईल का याबाबत साशंकता होती. पण त्याच्या आईने हार मानली नाही. युएस ओपन जिंकल्यानंतर झ्वेरेवने आठवणीने आईच्या योगदानाला दाद दिली. ‘टेनिस काय, मी कोणताही खेळ खेळेन असं कोणालाही वाटलं नव्हतं. लहानग्या मुलाला डायबेटिस झाला समजल्यावर खचून जायला होऊ शकतं. पण आई जिद्दी होती. डायबेटिसवरचे उपचार सुरू केले. तुला जे हवं ते कर सांगितलं. डायबेटिस तुझी वाटचाल रोखू शकत नाही असंही समजावलं. आज इथपर्यंत आगेकूच केली आहे, ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकतो आहे याचं श्रेय आईला आहे’.
कारकिर्दीत सुरुवातीला झ्वेरेव याबाबत बोलत नसे. मात्र २०२२ नंतर झ्वेरेवने अलेक्झांडर झ्वेरेव फाऊंडेशनची स्थापना केली. विकसनशील देशात डायबेटिस किंवा तत्सम आजाराचा सामना करत खेळणाऱ्या खेळाडूंसाठी हे फाऊंडेशन काम करतं.
ग्रँड स्लॅम स्पर्धेदरम्यान तब्येत राखणं कठीण आहे असं झ्वेरेव सांगतो. फ्रेंच ओपन स्पर्धेदरम्यान सामनाधिकाऱ्यांनी कोर्टवरच इंजेक्शन घेणाऱ्या झ्वेरेवला विचारणा केली होती. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या सामन्यात विश्रांती मिळावी म्हणून झ्वेरेव हे करतोय असा आरोपही केला गेला. ‘इंजेक्शन्स घेणं हा उपचारांचा भाग आहे. टेनिस हा दमवणारा खेळ आहे. सूट, सवलतीचा विषयच नाही’, असं त्याने सांगितलं.
सकाळी उठल्यानंतर झ्वेरेव साखरेची पातळी चेक करतो. रात्रीच्या वेळी झोपताना इन्शुलिन घेतो. डायबेटिस असलेल्या खेळाडूंना त्याचं न्यून न बाळगता खेळावं असं झ्वेरेव सांगतो. तुमची स्वप्नं डायबेटिसमुळे अर्धवट सोडू नका. यावर मात करता येऊ शकते असा सल्ला झ्वेरेव देतो.
