TNPL History: भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आधी एकच दार होतं, ते म्हणजे देशांतर्गत क्रिकेट. पण आयपीएल सुरू झाल्यापासून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. बरेच खेळाडू या स्पर्धेत चमकले आणि पुढे भारतीय संघात सामील झाले. पण आयपीएलमध्ये स्पर्धेसाठी निवड होण्याचा एक शॉर्टकर्ट तयार करण्यात आला आहे. तो म्हणजे स्टेट बोर्डकडून आयोजित करण्यात येणाऱ्या टी -२० लीग. या स्पर्धेत चमकणारे खेळाडू पुढे जाऊन हमखास आयपीएल खेळतात. त्यापैकीच एक लीग स्पर्धा म्हणजे तामिळनाडू क्रिकेट बोर्डकडून आयोजित करण्यात येणारी तमिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धा. या स्पर्धेने देखील भारतीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले आहेत.

या स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली?

तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात जून २०१६ मध्ये झाली होती. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत पावसामुळे भारतात फार क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जात नाहीत. पण राज्यातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावं म्हणून तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन भारताचा माजी फलंदाज एमएस धोनीच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंनी देखील सहभाग घेतला होता.

किती संघ खेळतात?

आयपीएलप्रमाणे खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकूण ८ संघ खेळतात.

१) चेपॉक सुपर गिलीज
२) दिंडीगुल ड्रॅगन्स
३) लायका कोवाई किंग्स
४) नेल्लाई रॉयल किंग्स
५) आयड्रीम तिरुपूर तमिझन्स
६)सलेम स्पार्टन्स
७) सीकेम मदुराई पँथर्स
८)त्रिची ग्रँड चोलास

या स्पर्धेने भारतीय क्रिकेटला काय दिलं?

या स्पर्धेने भारतीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. या स्पर्धेमुळे तामिळनाडूतील कानाकोपऱ्यातील खेळाडूंना मोठ्या स्तरावर आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, वरुण चक्रवर्ती, शाहरुख खान आणि साई किशोरसारखे खेळाडू याच स्पर्धेतून प्रसिद्धीच्या झोतात आले. पुढे या खेळाडूंवर आयपीएलमध्येही मोठी बोली लागली. या स्पर्धेने खेळाडूंना व्यासपीठ दिलं आणि पुढे या खेळाडूंनी भारतीय संघासाठी देखील दमदार कामगिरी केली. मुख्य बाब म्हणजे भारताचा माजी खेळाडू आर अश्विन देखील ही स्पर्धा खेळतो त्यामुळे, युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते.

स्पर्धेतील सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेणारे खेळाडू कोण?

या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नारायण जगदीशन अव्वल स्थानी आहे. त्याने २२२५ धावा केल्या आहेत. तर सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत साई किशोर अव्वल स्थानी आहे. त्याने ७५ गडी बाद केले आहेत.