INDW vs AUS W T20 World Cup 2026: भारतीय संघ महिला टी-२० विश्वचषकातील करो या मरो सामना खेळणार आहे आणि हा सामना ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धचा हा सामना उद्या २८ जूनला खेळवला जाईल. सेमीफायनलच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर होणार आहे. अ गटात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर असून त्यांची उपांत्य फेरीतील जागा जवळपास निश्चित झाली आहे. आता अ गटात भारताच्या सामन्यानंतर सेमीफायनलचे संघ निश्चित होतील.
भारत दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानी गुणतालिकेत असून दोन्ही संघांचे ६-६ गुण आहेत. पण भारताचा नेट रन रेट मात्र चांगला आहे. भारत किंवा दक्षिण आफ्रिका यांपैकी एक संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. बांगलादेशही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे, तरीही त्यांची तिथे पोहोचण्याची शक्यता कमीच आहे. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक सामना अद्याप शिल्लक आहे.
भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण?
जर भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर मात केल्यास, त्यांचे ८ गुण होतील आणि ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यासह दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याच्या निकालाचा स्पर्धेवर काहीच परिणाम होणार नाही.
जर भारतीय संघ पराभूत झाला आणि दक्षिण आफ्रिका जिंकली तर: या परिस्थितीत दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचेल. भारताचे सहा गुणच राहतील, तर दक्षिण आफ्रिकेचे आठ गुण होतील.
जर भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ हरले तर: भारताचा पराभव झाल्यास, त्यांना बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करावा अशी आशा करावी लागेल. अशा स्थितीत तीनही संघांचे प्रत्येकी सहा गुण होतील आणि चांगल्या ‘नेट रन रेट’मुळे भारत पुढच्या फेरीत जाईल.
पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका-बांगलादेश सामने रद्द झाले तर काय होणार?
जर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर दक्षिण आफ्रिका सात गुणांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागेल; मात्र सामना रद्द झाला तरीही त्यांचं काम सोपं होईल. पराभव झाल्यास त्यांच्या खात्यात सहाच गुण राहतील आणि दक्षिण आफ्रिका पुढील फेरीत प्रवेश करेल.
जर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा पराभव केला आणि भारताचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर भारताचे सात गुण होतील आणि दक्षिण आफ्रिका आठ गुणांपर्यंत पोहोचेल; परिणामी भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. मात्र, जर बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि भारताचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर हरमनप्रीतचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
