India’s Womens T20 WC 2026 Scenario After SA loss: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय महिला संघाला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पराभव पत्करावा लागला. अखेरच्या षटकात टीम इंडियाच्या या पराभवामुळे सेमीफायनल गाठण्याचा मार्ग खडतर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघापुढील आव्हानं नक्कीच वाढली आहेत, तरीही उपांत्य फेरीत धडक मारण्याची आशा अजूनही कायम आहे. भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी कसं समीकरण असणार आहे, जाणून घेऊया.
भारत, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे तिन्ही संघ प्रत्येकी चार गुणांसह समान स्थितीत असल्याने अ गटातील लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. परिणामी, उपांत्य फेरीच्या शर्यतीत केवळ विजयच नव्हे, तर नेट रन रेट देखील निर्णायक ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडून सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला असला, तरी भारतीय संघाच्या सेमीफायनलच्या आशा अजूनही जिवंत आहेत.
सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयांमुळे टीम इंडियाचा ‘नेट रन रेट’ +२.५११ इतका राहिला आहे. संघाचे अजून दोन सामने बाकी आहेत आणि उपांत्य फेरीचा मार्ग बऱ्याच अंशी या सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असेल. जर भारतीय संघाने बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा पराभव केला, तर अंतिम चारमध्ये (सेमीफायनलमध्ये) पोहोचण्याची त्यांची शक्यता अत्यंत प्रबळ होईल. चांगला ‘नेट रन रेट’ देखील संघासाठी फायदेशीर ठरेल. मात्र, या दोनपैकी एकाही सामन्यात संघाचा पराभव झाल्यास, त्यांना इतर संघांचे निकाल आणि ‘नेट रन रेट’च्या गणितांवर अवलंबून राहावं लागू शकतं.
भारतीय संघाचं उपांत्य फेरीसाठी समीकरण
१. भारतीय संघ अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. त्यांचे अजून दोन सामने बाकी आहेत. हे दोन्ही सामने जिंकल्यास, ‘नेट रन रेट’वर अवलंबून न राहता उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होऊ शकते. मात्र, यासाठी ऑस्ट्रेलियाने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने किंवा दक्षिण आफ्रिकेने किमान एक सामना गमावणं आवश्यक आहे.
२. जर भारताने दोन्ही सामने जिंकले, तर त्यांचे ८ गुण होतील. जर दक्षिण आफ्रिकेनेही त्यांचे दोन्ही सामने जिंकले, तर त्यांचेही ८ गुण होतील. भारताचे ८ गुण झाल्यास, ऑस्ट्रेलियालाही ८ गुणांच्या पुढे जाता येणार नाही. अशा स्थितीत, उपांत्य फेरीतील प्रवेशाचा निर्णय ‘नेट रन रेट’च्या आधारे घेतला जाईल.
३. भारतासमोरील आव्हान म्हणजे त्यांना बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळावं लागणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँड्स आणि बांगलादेशशी होणार आहे. ऑस्ट्रेलियावर मात करणं हे भारतासाठी कठीण काम असेल, याउलट दक्षिण आफ्रिकेचे सामने तुलनेने सोपे आहेत.
४. उपांत्य फेरीसाठी तिसरा दावेदार असलेल्या बांगलादेशलाही हलक्यात घेता येणार नाही. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी बांगलादेशला उर्वरित सामन्यांमधील भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा पराभव करावा लागेल. केवळ एका संघाचा पराभव केला तरीही त्यांचं काम सोपं होऊ शकतं, मात्र त्यासाठी त्यांचा ‘नेट रन रेट’ इतका चांगला असायला हवा की ज्यामुळे सहा गुणांसह दुसरे स्थान निश्चित करता येईल.
