CSK Playoffs Qualification Scenario: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५९ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पडला. लखनौला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पण घरच्या मैदानावर खेळताना लखनौने आपल्या चाहत्यांना विजयाचं गिफ्ट दिलं.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स संघाने १८७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाकडून मिचेल मार्शने ९० धावांची वादळी खेळी केली. शेवटी निकोलस पूरन आणि मुकुल चौधरीने लखनौला विजय मिळवून दिला. लखनौचा संघ आधीपासून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण चेन्नईचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. दरम्यान या पराभवानंतर चेन्नईसाठी कसं आहे प्लेऑफमध्ये जाण्याचं समीकरण? जाणून घ्या.
चेन्नई प्लेऑफमध्ये जाणार का?
चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंत १२ पैकी ६ सामने जिंकले आहेत. तर ६ सामने गमावले आहेत. १२ सामान्यांमध्ये चेन्नईने १२ गुणांची कमाई केली आहे. चेन्नईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. त्यासाठी पुढील दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. चेन्नईचे पुढील सामने गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघाविरुद्ध होणार आहेत. पण हे दोन्ही सामने जिंकूनही चेन्नईला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. कारण १६ गुणांवर पोहोचल्यानंतर नेट रनरेट महत्वाचा ठरेल.
चेन्नईचा पराभव
लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. चेन्नईकडून फलंदाजी करताना कार्तिक शर्माने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने नाबाद ३२ धावा केल्या. तर डेवाल्ड ब्रेव्हिसने २५ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्स संघाने २० षटकांअखेर ५ गडी बाद १८७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. तर जोश इंग्लिसने ३५ आणि शेवटी निकोलस पूरनने नाबाद ३२ धावांची खेळी करून लखनौला हा सामना ७ गडी राखून जिंकून दिला.
