आयपीएल २०२६ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ दमदार कामगिरी करत आहे. पण या संघाला नशिबाची हवी तितकी साथ मिळत नाहीये. पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीने सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती. तरीदेखील दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांचा पूर्णपणे फ्लॉप शो पाहायला मिळाला. संपूर्ण संघाचा डाव अवघ्या ७५ धावांवर आटोपला. हा दिल्लीचा या हंगामातील ५ वा पराभव ठरला. दिल्लीने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. त्यापैकी दिल्लीला केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. तर उर्वरित ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान ५ पराभवानंतर दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार का? जाणून घ्या कसं असेल समीकरण.

दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यापैकी ३ सामन्यांमध्ये दिल्लीला विजय मिळवता आला आहे. तर ५ सामने गमवावे लागले आहेत. ६ गुणांसह दिल्लीचा संघ सातव्या स्थानी घसरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर दिल्लीचा नेट रनरेट खराब झाला आहे. दिल्लीचा नेट रनरेट घसरून -१.०६० इतका झाला आहे.

दिल्लीचा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो का?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी दिल्लीला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. दिल्लीला जर प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल, या उर्वरित सर्व ६ सामने जिंकावे लागणार आहेत. असं झाल्यास दिल्लीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. ६ सामने जिंकून दिल्लीचा संघ १८ गुणांपर्यंत पोहोचू शकतो.

या ६ पैकी एकही सामना गमावला, तर दिल्लीचं प्लेऑफ गाठणं कठीण होईल. असं झाल्यास दिल्लीला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. गुणतालिकेत सध्या पंजाब किंग्जचा संघ अव्वल स्थानी आहे. पंजाबने आतापर्यंत १३ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरू शकतो. तर दिल्लीला पराभूत करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. उर्वरित ३-३ सामने जिंकून दोन्ही संघ प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करू शकतात.