How India Can Qualify For T20 WC SF: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने यजमानांना तब्बल ७६ धावांनी पराभूत केला. यासह सुपर-८ मोहिमेची भारतासाठी अत्यंत निराशाजनक सुरुवात झाली. या मोठ्या पराभवामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अजून दोन सामने बाकी असताना टीम इंडियाकडे आता चूकही करण्याची अजिबात संधी उरलेली नाही. शिवाय, त्यांच्या नेट रनरेटवर (NRR)ही मोठा परिणाम झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेने या सामन्याक नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने सुरुवातीला उत्कृष्ट गोलंदाजी करत क्विंटन डी कॉक, एडन मारक्रम आणि रायन रिकल्टन यांना पहिल्या पाच षटकांत माघारी धाडलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था २० धावांत ३ बाद अशी झाली होती. मात्र त्यानंतर डेव्हिड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी आक्रमक फलंदाजी करत प्रतिहल्ला चढवला आणि भारताला बचावात्मक भूमिकेत ढकललं. या भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने १८५ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भारताची वरची फळी पूर्णपणे कोसळली आणि संघाची अवस्था ५१ धावांत ५ बाद अशी झाली.

पॉवरप्लेमध्येच भारताने ३ विकेट्स गमावल्या आणि त्यानंतर ५१ धावांत ५ अशी अवस्था झाल्यानंतर भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करू शकला नाही. एकट्या शिवम दुबेने ४२ धावांची खेळी केली, पण त्याला साथ न मिळाल्याने संघ सामन्यात झुंजही देऊ शकला नाही आणि परिणामी फक्त १११ धावांवर सर्वबाद झाला आणि सामना मोठ्या फरकाने गमावला. यामुळे आता भारताचा नेट रन रेट वजामध्ये गेला आहे.

भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचू शकतो?

भारत सध्या ‘करो या मरो’ अशा स्थितीत आहे. सुपर-८ मधील कमीत कमी २ सामने जिंकत संघ सुपर-८ गाठू शकतो. पण भारताची सुरूवात इतकी वाईट झाली आहे की त्यांना आता एक चूकही पुढे करून चालणार नाही. भारताचा पुढील सामना गुरुवारी २६ फेब्रुवारीला चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील अखेरच्या सामन्यात रविवारी २७ फेब्रुवारीला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजशी सामना रंगणार आहे.

भारताला केवळ स्वतःचे दोन्ही सामने जिंकणं पुरेसे ठरणार नाही, तर दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना पराभूत करणं हेदेखील गरजेचं असणार आहे. अन्यथा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. जर मारक्रमच्या संघ झिम्बाब्वे-वेस्ट इंडिज सामन्यात पराभूत झाला, तर भारताने दोन विजय मिळवूनही उपांत्य फेरीचं समीकरण अवघड होऊ शकतं, कारण तीन संघ चार गुणांवर बरोबरीत येऊ शकतात.

अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला केवळ विजयच नव्हे, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणं आवश्यक ठरेल, जेणेकरून नेट रनरेट (NRR) सुधारता येईल आणि पुढील फेरीचे तिकीट निश्चित करता येईल.

टी-२० वर्ल्डकप २०२६ पहिल्या गटाची गुणतालिका

T20 WC 2026 Super 8 points Table after IND vs SA Match
टी-२० वर्ल्डकप सुपर-८ गुणतालिका