‘मला आयपीएल खेळायचं होतं, पैसा कमवायचा होता. यासाठी मी भूमिका घेतली, त्याचे परिणाम मला भोगावे लागले पण त्यातून इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचं भलं झालं याचा आनंद आहे’, असं केव्हिन पीटरसनने सांगितलं. इंग्लंडचा माजी खेळाडू पीटरसनने जोस बटलरशी साधलेल्या संवादादरम्यान १८ वर्षांपूर्वींचा घटनाक्रम उघड केला.
‘मला आयपीएल खेळायचं होतं. जास्त पैसा कमवायचा होता. याकरता मे महिन्यात होणारे काही कसोटी सामने मी खेळू शकणार नव्हतो. त्या सामन्यांना तसाही फारसा अर्थ नव्हता’, असं पीटरसनने सांगितलं.
‘इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि ललित मोदी यांच्यातल्या व्यापारी युद्धात मी केंद्रस्थानी अडकलो. आता मागे वळून पाहताना असं वाटतं की मी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करू शकलो असतो. पण मी खरं बोलत होतो. मी काहीही लपवलं नाही. त्यामुळे तेव्हाही मला रोज रात्री झोप गाढ झोप लागायची. चहाच्या पेल्यातलं वादळ होतं’.
आयपीएल हे अजस्र यंत्रासारखं मोठं आहे आणि त्याची व्याप्ती वाढत जाणार हे स्पष्ट होतं. मी ते ओळखलं. आयपीएल खेळण्याला प्राधान्य देण्याच्या निर्णयाचा मला नक्कीच फटका बसला असं पीटरसन म्हणाला.
बटलरने मानले आभार
‘युट्यूब चॅनलसाठी मी अलीकडेच जोस बटलरची मुलाखत घेतली. त्याने अक्षरक्ष: माझे आभार मानले. आयपीएल खेळण्यासाठी मी व्यवस्थेविरोधात गेलो, भूमिका घेतली. माग हटलो नाही. माझ्या कारकिर्दीचं नुकसान झालं पण मी ठाम राहिलो. यथावकाश इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा आयपीएलप्रति दृष्टिकोन बदलला. त्यांनी त्यांच्या कॅलेंडरमध्ये बदल केले. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना सहजपणे एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) मिळू लागली. या सगळ्याची रुजवात माझ्या बंडखोर भूमिकेतून झाली होती. त्यामुळे त्याने आभार मानले’, असं पीटरसनने सांगितलं.
पीटरसनच्या भूमिकेमुळे इंग्लंडचे असंख्य खेळाडू आयपीएलमध्ये नियमितपणे खेळत आहेत. जोस बटलर, जोफ्रा आर्चर, सॅम करन, मोईन अली यांनी या स्पर्धेत नाव कमावलं, पैसेही मिळवले. आता या खेळाडूंसाठी आयपीएलमध्ये खेळणं सहज झालं आहे. पण त्यासाठी पीटरसनला मोठं बलिदान द्यावं लागलं आहे.
दिग्गजांकडून शिकायला मिळालं
‘आरसीबी संघाकडून खेळताना मला डेल स्टेन, जॅक कॅलिस, राहुल द्रविड अशा दिग्गजांबरोबर खेळायला मिळालं. जॅक कॅलिस एक महान अष्टपैलू खेळाडू आहे. तो सामन्याची तयारी कशी करतो ते समजलं. आशियाई उपखंडात खेळताना विशेषत: फिरकीपटूंविरुद्ध खेळताना मला जमत नसे. यासंदर्भात मी राहुल द्रविडला मेल केला. त्याचं मोठेपणा हा की त्याने मेलला उत्तर दिलं. मी काय करावं यासाठी काही उपाय सांगितले. ते मी अनुसरले आणि मला प्रचंड फायदा झाला. राहुल द्रविडसारख्या मोठ्या खेळाडूशी मी संपर्क करू शकलो कारण आयपीएलच्या माध्यमातून आमची ओळख झाली होती. तो किती मोठा खेळाडू आहे हे मी स्वत: पाहिलं होतं’.
‘मी २००९ मध्ये आरसीबीसाठी खेळलो. जगभरातल्या असंख्य खेळाडूंबरोबर ड्रेसिंगरुम शेअर केली. त्याचवेळी ही स्पर्धा पुढेही खेळत राहावं असं वाटलं. माझ्या खेळातल्या ज्या उणीवा आहेत त्या दूर करून जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज व्हावं असं वाटलं. मी काही आठवडे आयपीएल खेळावं, मग इंग्लंडसाठी टेस्ट खेळायला हजर व्हावं, ती मालिका झाल्यानंतर पुन्हा आयपीएल खेळायला जावं असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाला वाटत होतं. मी तसं केलं नाही. आमचे संबंध बिघडले, कायमचे दुरावले. मला द्रविड,कुंबळे, कॅलिस यांच्याबरोबर खेळायचं होतं. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांना माहिती होतं की मी बरोबर आहे. त्यांनी मान्य केलं नाही पण त्यांना ठाऊक होतं’.
बेथेलच्या वाटचालीत आरसीबीचा वाटा
‘आयपीएलच्या माध्यमातूनपैसा भरपूर मिळतो. पण तो एक भाग झाला.त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. अतिशय उष्ण आणि दमट वातावरणात, हजारो चाहत्यांनी भरलेल्या स्टेडियममध्ये सर्वोत्तम खेळ करावा लागतो. दोन महिने सतत प्रवास करावा लागतो. टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सेमी फायनलमध्ये जेकब बेथेलने अविस्मरणीय खेळी साकारली. इंग्लंडचा संघ हरला पण बेथेलची खेळी चाहत्यांच्या स्मरणात राहील. सामन्यानंतर बेथेलने आरसीबीकडून खेळण्याचा अनुभव महत्त्वपूर्ण ठरल्याचं सांगितलं’.
द्रविडबरोबर खास नातं
‘राहुल द्रविडबरोबरच्या ऋणानुबंधाने माझं आयुष्य बदललं. डीआरएस आलं. मी फ्रंटफूटवर खेळणारा खेळाडू होतो. प्रतिस्पर्धी संघ सापळा रचून मला बाद करू लागले. मी हताश झालो. मी द्रविडकडे मदत मागितली. त्याने अगदी तत्परतेने इमेल केला. हा त्याचा मोठेपणा आहे. आयपीएलने मला वादविवादाच्या केंद्रस्थानी आणलं पण या स्पर्धेप्रति, खेळाडूंप्रति, संधीसाठी मी कायमच ऋणी राहीन. आयपीएलने माझी इंग्लंडची कारकीर्द तारली’, असं पीटरसनने आवर्जून सांगितलं.
आरसीबीचं जेतेपद हे अथक परिश्रमाचं फळ
‘आरसीबी हा नेहमीच ताकदवान संघ होता. ते चांगलं खेळत असत मात्र एखादा सामना, एखादा क्षण आणि सगळं विरुन जायचं. गेल्या वर्षी त्यांचं जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. विराट कोहलीने या संघासाठी सर्वस्व दिलं आहे. आरसीबी जिंकल्यानंतर आपण पाहिलं की त्या खेळाडूंसाठी हा क्षण किती अमूल्य होता. या संघासाठी अनेक मोठे खेळाडू खेळाले. ख्रिस गेल, एबी डीव्हिलियर्स अशी अनेक नावं आहेत. त्या सगळ्यांनी जपलेल्या परंपरेचा हा विजय आहे. आरसीबाकडे चाहत्यांच्या प्रेमाचं मोठं बळ आहे’.
‘आयपीएल केवळ पैसाच मिळवून देतं असं नाही. हजारो चाहत्यांसमोर तुम्हाला खेळायची संधी मिळते. तुमचा चाहता वर्ग वाढतो. ब्रँड तयार होतो. तुम्हाला प्रचंड असं प्रेम मिळतं. आशियाई उपखंडात खेळण्याचा सराव होतो. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बरोबरीने ड्रेसिंगरुम शेअर करायला मिळते. प्रवासात, सामन्यादरम्यान संवाद होतो. फक्त खेळासंदर्भात नव्हे तर वैयक्तिक आयुष्यासाठीही शिदोरी मिळते. अशा स्पर्धेत खेळायची संधी सोडणं हा वेडेपणा ठरला असता’, असं पीटरसन म्हणाला.
प्रचंड पैसा हे युवा खेळाडूंसमोरचं प्रलोभन
‘निवृत्तीनंतरही मी व्यग्र आहे. पॉडकास्ट करतो. युट्यूब चॅनलमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. समालोचनही करतो. भरपूर गोल्फ खेळतो. कोणाला किती पैसे मिळाले, कोणाचा करार किती रुपयांचा आहे याची चर्चा होते. युवा खेळाडूंसमोरचं ते मोठं आव्हान आहे’, असं पीटरसनला वाटतं.
आधुनिक काळात इंग्लंडचा अग्रगण्य शिलेदार असलेल्या पीटरसनने ३६ आयपीएल सामन्यात १३४.७२च्या स्ट्राईकरेटने १००१ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. पीटरसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली डेअरडेव्हिल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला. २००९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ७.५ कोटी रुपये खर्चून त्याला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. १८ वर्षांपूर्वी साडेसात कोटी ही मोठी रक्कम होती.
