आयपीएल २०२६ स्पर्धेतील २५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी विजयाची संधी निर्माण झाली होती. पण शेवटी गुजरात टायटन्सने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला आणि गुणतालिकेत झेप घेतली. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सचा डाव १८० धावांवर आटोपला. १८१ धावांचा पाठलाग करताना कर्णधार गिलने दमदार अर्धशतकी खेळी केली आणि गुजरातचा विजय निश्चित केला. हा कोलकाताचा सलग पाचवा पराभव ठरला. पण कोलकाताचा संघ अजूनही स्पर्धेतून बाहेर झालेला नाही. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी कसं असेल कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी समीकरण? जाणून घ्या.

हा सामना गमावताच कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नावे नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. कोलकाताचा संघ पाचवा असा संघ ठरला आहे, ज्या संघाने लागोपाठ ६ सामन्यांमध्ये एकही विजय मिळवलेला नाही. आतापर्यंत जितक्या वेळेस असं झालं आहे, त्यावेळी ते संघ गुणतालिकेत तळाशी राहिले आहेत. पण क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा अजूनही कायम आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी कसं असेल समीकरण?

कोलकाताने आतापर्यंत ६ सामना खेळले असून ५ सामने गमावले आहेत. १ सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे कोलकाताचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. अजूनही ८ सामने शिल्लक आहेत. हे सर्व सामने जिंकले तर कोलकाताचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. जर सर्व ८ सामने जिंकले, तर हा संघ १७ गुणांपर्यंत पोहोचू शकतो आणि १७ गुणांसह प्लेऑफ गाठणं शक्य आहे.

पण यापैकी एकही सामना गमावला तर कोलकाताच्या अडचणीत वाढ होऊ शकते. असं झाल्यास कोलकाताची गाडी १५ गुणांवर थांबेल. गेल्या हंगामात दिल्लीने देखील १५ गुणांची कमाई केली होती. पण हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नव्हता. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाला जर प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल, तर प्रत्येक सामना हा नॉकआऊट सामन्यासारखाच खेळावा लागणार आहे.