अगदी परवापर्यंत माधव तिवारी हे नाव क्रिकेटचाहत्यांनाही फारसं ठाऊक नव्हतं. मात्र सोमवारनंतर हे नाव ट्रेन्डिंग होऊ लागलं. कोण आहे माधव तिवारी अशा बातम्या दिसू लागल्या. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सीनिअर पातळीवरचा एकही सामना न खेळलेल्या माधवसाठी पंजाब किंग्जविरुद्धची लढत आयपीएलमधला केवळ दुसरा सामना होता. ८ चेंडूत १८ धावा आणि २ विकेट्स पटकावणाऱ्या माधवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. डोमेस्टिक क्रिकेट खेळलेला नाही मग दिल्लीने माधवला कसं शोधलं? माधवप्रमाणेच असंख्य गुणी प्रतिभाशाली खेळाडू दरवर्षी आयपीएल स्पर्धेत येतात. ते नेमके येतात कुठून ते जाणून घेऊया

माधवने डोमेस्टिक क्रिकेट खेळलं नसलं तरी तो गेली दोन वर्ष तो मथ्य प्रदेश प्रीमिअर लीग स्पर्धेत भोपाळ लेपर्ड्स संघाकडून खेळतो आहे. या स्पर्धेदरम्यान खेळताना माधवने आपल्या वेगाने, अचूक टप्प्याने तसंच फटकेबाजीने प्रभावित केलं. दिल्लीच्या स्काऊटिंग टीमने याच स्पर्धेत माधवला हेरलं. गेल्या वर्षी लिलावात ४० लाख रुपये मोजून दिल्लीने माधवला संघात घेतलं. गेल्यावर्षी मुंबईविरुद्ध त्याने आयपीएलविरुद्ध पदार्पण केलं. त्या लढतीत त्याने तीन धावा केल्या. गोलंदाजीची संधीच मिळाली नाही. यंदाच्या हंगामात पूर्वार्धात माधवला संधीच मिळाली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर दिल्लीची गाडी रुळावरून घसरली. प्लेऑफसाठी पात्र होण्याची अंधुक संधी दिल्लीकडे आहे. पंजाबविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत माधवने चांगली गोलंदाजी करत सगळ्यांना प्रभावित केलं. चांगली गोलंदाजी केलीस तर दुसरं षटक देईन नाहीतर मीच गोलंदाजीला येईन असं कर्णधार अक्षर पटेल माधवला म्हणाला होता. माधवने ४ षटकांचा स्पेल पूर्ण करत २ विकेट्स पटकावल्या. त्यानंतर फलंदाजीत त्याने .. छोटी पण उपयुक्त खेळी केली.

मध्य प्रदेश प्रीमिअर लीग या स्पर्धेकडे टॅलेंट स्काऊट मंडळी अतिशय गांभीर्याने बघतात. मध्य प्रदेश राज्य संघटनेतर्फे आयोजित या लीगच्या पहिल्या लिलावात तब्बल २४३ खेळाडूंची नावं होती. आयपीएल लिलावाची सूत्रं सांभाळणारे चारु शर्मा मध्य प्रदेश प्रीमिअर लीगच्या लिलावाला ऑक्शनर म्हणून कार्यरत होते. आयपीएलच्या माध्यमातून नाव कमावलेले रजत पाटीदार आणि वेंकटेश अय्यर यांची मार्की प्लेयर म्हणून नोंद झाली होती. मुंबई, दिल्ली, कर्नाटक ही भारतीय क्रिकेटमधली सत्ताकेंद्रं आहेत. त्या तुलनेत मध्य प्रदेश अगदीच नवखं नाव पण या लीगच्या माध्यमातून त्यांनी आयपीएलला गुणवान खेळाडू दिले आहेत.

इंडियन एक्स्प्रेसने गेल्या वर्षी आयपीएलमधल्या खेळाडूंचा आढावा घेतला होता. कर्नाटक, मुंबई, दिल्ली यांचा दबदबा असणं साहजिक. पण अलीकडच्या वर्षांमध्ये पंजाब आणि मध्य प्रदेश ही नवी टी२० सत्ताकेंद्र म्हणून समोर येत आहेत. मध्य प्रदेश हे आकाराच्या दृष्टीने देशातलं दुसरं मोठं राज्य आहे. पण भारतीय क्रिकेटचा विचार केला तर मध्य प्रदेशने भारताला चार कसोटीपटू दिले तर पाचजण वनडे आणि टी२० संघाकडून खेळले.

मध्य प्रदेश क्रिकेटचा ठसा उमटण्यात बीसीसीआयचे माजी सचिव, माजी खेळाडू संजय जगदाळे यांची भूमिका महत्त्वाची आहे. २०००च्या दशकात आम्ही मध्य प्रदेश क्रिकेटसाठी रोडमॅप तयार केला. आमच्याकडे इतिहास, संस्कृती, प्रतिभा आणि संसाधनं आहेत. या सगळ्याचा मेळ घालत गुणी क्रिकेटपटू घडवणं हे काम होतं. युवा खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण मिळणं महत्त्वाचं होतं. यासाठी आम्ही इंदूर इथे अकादमी स्थापन केली. राज्यभरातून युवा खेळाडूंना निवडलं. त्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळेल याची काळजी घेतली. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या ग्वाल्हेर, भोपाळ, होशंगाबाद, रीवा, जबलपूर इथे छोट्या स्वरुपाच्या अकादमी चालतात. राज्यभरातल्या होतकरू क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावं यासाठी मध्य प्रदेश प्रीमिअर लीग स्पर्धा सुरू करण्यात आली.

मध्य प्रदेश प्रीमिअर लीगमध्ये खेळणारे ११ खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहेत. गेल्या वर्षी लिलावात माधव तिवारी, शिवम शुक्ला आणि अनिकेत वर्मा यांना संधी मिळाली. माधव, विग्नेश पुत्तूर आणि अभिनंदन सिंग यांनी कोणत्याही स्वरुपाचं डोमेस्टिक क्रिकेट खेळलेलं नाही. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गेल्या वर्षी पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं. अनेक हंगाम कोलकातासाठी चांगली कामगिरी केल्यानंतर वेंकटेश अय्यर आता आरसीबी संघाचाच भाग आहे. मध्य प्रदेश प्रीमिअर लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या मंगेश यादवला आरसीबीने तब्बल ५.२० कोटी खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं. अनिकेत वर्मा सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो आहे. अवेख खान लखनौ संघाचा भाग आहे. आशुतोष शर्मा दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिनिशर आहे. अर्शद खान गुजरात टायटन्सचा भाग आहे. १८ वर्षीय अक्षत रघुवंशी लखनौकडे आहे. लखनौनं त्याच्यासाठी २.२० कोटी रुपये खर्च केले आहेत. कुलदीप सेन राजस्थान रॉयल्सच्या वेगवान आक्रमणाचा भाग आहे. फिरकीपटू कुमार कार्तिकेय मुंबई आणि राजस्थाननंतर आता गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. सनराझयर्स हैदराबादने शिवांग कुमारला नियमितपणे संधी दिली आहे.