बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर होत असलेल्या हल्ले आणि अत्याचाराच्या मुद्यावरून इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत बांगलादेशच्या खेळाडूला खेळू देण्यासंदर्भात रण पेटलं आहे. आयपीएल २०२६ हंगामात बांगलादेशचा एकच खेळाडू निवडला गेला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमान याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने ताफ्यात समाविष्ट केलं. एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या हंगामात मुस्ताफिझूर खेळणार का याविषयी साशंकता आहे.

भारतात ठिकठिकाणी बांगलादेशविरोधात आंदोलने करण्यात आली. तसेच आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडूंना खेळण्यास घेऊ नये, अशीही मागणी जोर धरत आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमध्ये खेळवण्यास जोरदार विरोध दर्शवला आहे.बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे भारतीय भूमीवर आणि आयपीएलमध्ये त्यांच्या खेळाडूंवर खेळण्यापासून बहिष्कार टाकला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

“शाहरुख खानने तात्काळ त्या बांगलादेशी खेळाडूला त्याच्या संघातून काढून टाकावे. त्याने असे केल्यास ते देशभक्तीचे प्रतीक ठरेल. पण इतका गदारोळ होऊनही शाहरुख खानबाबत शंका व्यक्त होऊ शकते. ते या देशात राहून पैसे तर कमवतात पण या देशाची भावना समजत नाहीत, असे दिसेल. या देशासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली आहे. हा दिवस पाहण्यासाठी त्यांनी नक्कीच बलिदान दिलेले नव्हते”, अशी भावना आनंद दुबे यांनी व्यक्त केली.

आनंद दुबे पुढे म्हणाले, “शाहरुख खान उत्तम कलाकार आहेत. आपल्या सर्वांचेच ते लाडके आहेत. पण आता पैसे, व्यापार आणि मनोरंजनाचा विषय नाही तर देशाचा प्रश्न आहे. देशापेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. शिवसेना किंवा भाजपाच्या नेत्यांनी सांगण्याआधी शाहरुख खानने त्या बांगलादेशी खेळाडूची हकालपट्टी करावी. जेणेकरून ते देशाच्या भावनेला समजतात, हा संदेश लोकांमध्ये जाईल.”

बांगलादेशी खेळाडू आयपीएलसाठी मैदानात खेळण्यास उतरले तर धार्मिक योद्धे मैदानावर चाल करतील आणि सामने बंद पाडतील, असा इशारा उज्जैनमधील रिंमुक्तेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुजारी महावीर नाथ यांच्यासह काही साधूंनी मध्यंतरी दिला होता. बांगलादेशमध्ये एकाबाजूला हिंदूंचा छळ होत असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या क्रिकेटपटूंना भारतात खेळण्याची परवानगी देऊ नये, तसेच इतर धार्मिक नेत्यांनीही यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्य पुजाऱ्यांनी केले आहे.

यानिमित्ताने सख्खे शेजारी असलेल्या बांगलादेशचे किती खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळले आहेत जाणून घेऊया.

अब्दुर रझ्झाक

डावखुरा फिरकीपटू अब्दुर रझ्झाक आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता. त्याला एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तो खेळला. राजस्थानच्या खेळाडूंनी त्याच्या २ षटकात २९ धावा चोपून काढल्या. यामुळे रझ्झाकला पुन्हा गोलंदाजीच मिळाली नाही. बंगळुरू संघ त्या सामन्यात पराभूत झाला. रझ्झाक पुन्हा आयपीएलमध्ये खेळलाच नाही.

मोहम्मद अशरफुल

सतराव्या वर्षी कसोटी शतक झळकावत मोहम्मद अशरफुलने आंतरराष्ट्रीय पटलावर नाव कोरलं. अशरफुल आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. २००९ हंगामात तो मुंबईकडून एक सामना खेळला. अशरफुल मुंबईकडून दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खेळला. त्याने १० चेंडूत २ धावा केल्या. अशरफुलला पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

मश्रफी मुर्तझा

कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशच्या या युवा वेगवान गोलंदाजाला संघात सामील करून घेतलं. रझ्झाक आणि अशरफुल यांच्याप्रमाणेच मुर्तझालाही एकाच सामन्यापुरती संधी मिळाली. डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या सामन्यात मुर्तझाच्या एका षटकात २६ धावा कुटल्या गेल्या. सामन्यात त्याच्या गोलंदाजीचं पृथकरण होतं ४ षटकात ५८ धावा. नरेल एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध मुर्तझा बांगलादेशच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. बांगलादेशचा अव्वल वेगवान गोलंदाज म्हणून मुर्तझाचं नाव घेतलं जातं.

तमीम इक्बाल

बांगलादेशचा धडाकेबाज सलामीवीर तमीम इक्बालला पुणे वॉरियर्स संघाने संघात घेतलं होतं. २०१२ मध्ये तमीम पुणे संघाचा भाग होता. अंतिम अकरात केवळ चारच विदेशी खेळाडू खेळू शकत असल्याने तमीमला खेळायची संधीच मिळाली नाही. पुढच्या हंगामांमध्ये तमीमला संघात घेण्यात कोणत्याही फ्रँचाइजींनी स्वारस्य दाखवलं नाही.

शकीब अल हसन

आधुनिक काळातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेला शकीब अल हसन आयपीएल स्पर्धेत नियमितपणे खेळला. तो अनेक वर्ष कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने जेतेपदावर नाव कोरलं. त्या मोहिमेचा शकीब अविभाज्य घटक होता. कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता, धावा रोखण्याची आणि विकेट्स पटकावण्याची क्षमता असलेला फिरकीपटू आणि चपळ क्षेत्ररक्षक अशा तिन्ही आघाड्यांवर शकीबने कोलकातासाठी योगदान दिलं. २०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने शकीबला ताफ्यात घेतलं. २०२१ मध्ये त्याचं केकेआर संघात पुनरागमन झालं. २०२३ मध्येही कोलकाताने त्याची संघात निवड केली होती पण वैयक्तिक कारणांमुळे शकीबने माघार घेतली. आयपीएल कारकिर्दीत शकीबने ७१ सामन्यात १२४.४९च्या स्ट्राईक रेटने ७९३ धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरीने त्याने ६३ विकेट्सही पटकावल्या आहेत.

मुस्ताफिझूर रहमान

फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने मुस्ताफिझूर रहमानला संघात घेतलं. त्याचवर्षी हैदराबादने जेतेपदावर नाव कोरलं. दिमाखदार कामगिरीमुळे मुस्ताफिझूरला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. चांगल्या कामगिरीमुळे हैदराबाद संघाने त्याला रिटेन केलं. २०१८ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने त्याला संघात समाविष्ट केलं. २०२१ मध्ये मुस्ताफिझूर राजस्थानच्या ताफ्यात गेला. पुढच्या वर्षी तो दिल्लीकडून खेळला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने त्याला संघात घेतलं. आता तो कोलकाता नाईट रायडर्सकडे आहे. टिच्चून मारा करत धावा रोखण्यात मुस्ताफिझूर माहीर आहे. भागीदारी फोडण्यात तो पटाईत आहे. कोलकाता नाइट रायडर्सने ९.२० कोटी रुपयांची बोली लावून मुस्ताफिझूरला संघात घेतले.

लिट्टन दास

आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध यष्टीरक्षक फलंदाज लिट्टन दास २०२३ हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. त्याला एका सामन्यात संधी मिळाली. त्याने ४ धावा केल्या. कौटुंबिक कारणांमुळे लिट्टनला मायदेशी परतावं लागलं. त्याच्याऐवजी जॉन्सन चार्ल्सचा संघात घेण्यात आलं. कोलकाताने लिट्टनला रिटेन केलं नाही.