How Many Centuries Virat Kohli Need To Break Sachin Tedulkar Record: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. एकीकडे वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची चर्चा रंगलेली असताना, विराटने शतक झळकावून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात २९६ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चेसमास्टर विराटने नाबाद १३९ धावांची खेळी केली आणि भारतीय संघाला एकतर्फी विजय मिळवला. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५५ वे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीती ८६ वे शतक आहे. दरम्यान विराट सचिनचा १०० शतकांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. हा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याला आणखी किती शतकं झळकवावी लागणार आणि त्याला किती सामने खेळण्याची संधी मिळू शकते? हे गणित समजून घ्या.
विराटने गेल्या काही वनडे सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी केली आहे.गेल्या १० डावात फलंदाजी करताना त्याने ४ शतकं झळकावली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना झळकावेलेलं हे शतक त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५५ वे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८६ वे शतक आहे. विराटला सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यासाठी १४ शतकांची गरज आहे. तर हा रेकॉर्ड मोडून पुढे जाण्यासाठी आणखी १५ शतकं झळकवावी लागणार आहेत. हे अशक्य तर नाही, पण कठीण नक्कीच आहे. विराटने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने स्पष्ट केलं आहे की, आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेनंतर तो निवृत्त होऊ शकतो. त्यामुळे त्याला मोजकेच सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.
विराट कोहली आणखी किती सामने खेळू शकतो?
भारतीय संघाला वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेपर्यंत ३७ वनडे सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. विराटने गेल्या १० डावांत फलंदाजी करताना ४ शतकं झळकावली आहेत. या सरासरीनुसार, त्याला १५ शतकं झळकावण्यासाठी प्रत्येक १० डावात ५ शतकं झळकवावी लागणार आहेत. यादरम्यान द्विपक्षीय मालिका, आशिया चषक स्पर्धा आणि वर्ल्डकप स्पर्धेत फलंदाजी करताना जर त्याने आक्रमक फलंदाजी केली आणि एकापाठोपाठ एक शतकं झळकावली, तर तो सचिनचा १०० शतकांचा रेकॉर्ड सहज मोडू शकतो.
पहिल्याच वनडेत दमदार शतकी खेळी
विराट कोहली मोडणार की नाही, हे येत्या काही महिन्यात समजेलच. पण विराटने वनडे क्रिकेटमध्ये जे काही केलं आहे, ते फार कमी खेळाडूंना जमलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने ७४ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५००० धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला. या रेकॉर्डमध्ये त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकलं.
