Virat Kohli Sachin Tendulkar 100 Centuries Record Breakdown: भारताचा रन मशीन किंग कोहली उत्कृष्ट फॉर्मात आहे. विराट कोहलीने नुकत्याच वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत वेगाने धावा करत नाबाद शतकी खेळी साकारली होती. विराट कोहलीने या शतकासह त्याचं एकूण ८६वं शतक झळकावलं होतं. विराट कोहलीने वनडेमध्ये सर्वाधिक शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विराट सचिनचा विक्रम मोडणार का आणि हा विक्रम मोडण्यासाठी त्याला २०२७ वर्ल्डकपपर्यंत किती सामने खेळण्याची संधी मिळू शकते, जाणून घेऊया.

२०२३च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत वनडे कारकिर्दीतील ५०वं शतक झळकावलं आणि मास्टर ब्लास्टरचा ४९ वनडे शतकांचा विक्रम मोडला. या खेळीसह तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम कोहलीच्या आवाक्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तेंडुलकरच्या नावावर असलेली १०० शतकं आजही एक मोठा विक्रम आहे. त्यामुळे कोहलीकडे १०१ आंतरराष्ट्रीय शतकं करणारा जगातील पहिला फलंदाज बनण्याची संधी आहे.

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर समीकरण बदललं. त्याची टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्द आधीच संपली होती. त्यामुळे तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी आता कोहलीसमोर वनडे क्रिकेट हाच एकमेव मार्ग उरला आहे. आता २०२७चा विश्वचषक सुरू होण्यासाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना कोहलीच्या नावावर ८६ आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. म्हणजेच तेंडुलकरच्या १०० शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी त्याला आणखी १४ शतकांची, तर विक्रम मोडण्यासाठी १५ शतकांची गरज आहे.

भारताला वर्ल्डकप २०२७पूर्वी एकूण किती वनडे मालिका खेळायच्या आहेत?

सध्या भारताच्या २०२७च्या वनडे विश्वचषकापूर्वी तीन द्विपक्षीय मालिकांमधील एकूण ११ वनडे सामने निश्चित आहेत. यामध्ये न्यूझीलंडविरुद्ध पाच, श्रीलंकेविरुद्ध तीन आणि झिम्बाब्वेविरुद्ध तीन वनडे सामन्यांचा समावेश आहे. भारताच्या विश्वचषक मोहिमेला ७ ऑक्टोबर २०२७ रोजी केपटाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने सुरुवात होणार आहे.

नवीन FTPनुसार, विश्वचषकाच्या काही आठवडे आधी दक्षिण आफ्रिकेत आणखी सहा सामन्यांची वनडे मालिका आयोजित केली जाऊ शकते. या मालिकेमुळे भारतीय संघाला विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीशी जुळवून घेण्याची चांगली संधी मिळेल. मात्र, या मालिकेचा अद्याप निश्चित वेळापत्रकात समावेश झालेला नाही.

निश्चित द्विपक्षीय वनडे सामने

भारत वि. न्यूझीलंड – ५ सामन्यांची वनडे मालिका
भारत वि. श्रीलंका – ३ सामन्यांची वनडे मालिका
भारत वि. झिम्ब्बाब्वे – ३ सामन्यांची वनडे मालिका
आशिया चषक २०२७ – एकदिवसीय फॉरमॅट – १८ जून ते ४ जुलै – ६ सामने होण्याची शक्यता
२०२७ वनडे वर्ल्डकप गट टप्पा – ५ सामने
सुपर-७ फेरीत पोहोचल्यास – ६ सामने
उपांत्य व अंतिम सामन्यात पोहोचल्यास – २ सामने

म्हणजेच विराट कोहलीला २५ ते ३० वनडे सामने खेळण्याची संधी मिळणार आहे आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडण्यासाठी त्याच्यासमोर १५ शतकांचं लक्ष्य आहे.

भारतात की परदेशात? कोहलीच्या अलीकडच्या शतकांचा कल

विराट कोहलीच्या अलीकडच्या वनडे कामगिरीत घरच्या मैदानावर आणि विदेशात मोठा फरक पाहायला मिळतो. भारतात खेळलेल्या त्याच्या मागील ३२ वनडे सामन्यांमध्ये त्याने तब्बल ९ शतकं झळकावली आहेत. तर विदेशात तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या मागील ३२ वनडे सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ३ शतकं आहेत. ही तीन शतकं दुबई, चटगाव आणि कोलंबो येथे आली आहेत.

विदेशातील वनडेमधील विराट कोहलीची एकूण कामगिरीही दमदार आहे. त्याने केलेल्या ५५ वनडे शतकांपैकी २७ शतकं भारताबाहेर झळकावली आहेत. यापैकी बांगलादेश ही त्याची सर्वाधिक फलदायी भूमी ठरली असून, तिथे त्याने ६ शतकं केली आहेत. त्यानंतर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी ५ शतकं आहेत. वेस्ट इंडिजमध्ये त्याच्या नावावर ४ शतकं, दक्षिण आफ्रिकेत ३, तर न्यूझीलंड, इंग्लंड, झिम्बाब्वे आणि यूएईमध्ये प्रत्येकी १ शतक आहे.