आयपीएल संघांचं होमग्राऊंड म्हटलं की मुंबई इंडियन्सचं वानखेडे, कोलकाता नाईट रायडर्सचं इडन गार्डन्स तसंच राजस्थान रॉयल्स संघासाठी जयपूरचं सवाई मानसिंग स्टेडियमम. होम ग्राऊंडवर संघांना चाहत्यांची प्रचंड गर्दी होते. आपल्या लाडक्या खेळाडूला, संघाला पाहायला चाहते आतूर असतात. वानखेडे स्टेडियमवर सामना असला की दुपारी ४ वाजल्यापासून परिसरात वातावरण मुंबई इंडियन्समय होऊन जातं. संघाची कामगिरी नीट होत नसेल किंवा कामगिरीत सातत्य नसेल तर चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर संघाची कामगिरी बदलते असा अनुभव आहे.

मात्र ज्या शहरांचे संघ नाहीत अशा मैदानांवरही सामने झाले आहेत. दोन्ही संघांपैकी कुणाचंच होमग्राऊंड नाही अशा मैदानावर सामने झाले आहेत. अशाच मैदानांचा आणि त्यामागच्या कारणांचा घेतलेला आढावा. राज्यातलंच उदाहरण घ्यायचं झालं तर वानखेडे स्टेडियम हे आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून मुंबई इंडियन्सचं होमग्राऊंड आहे. ज्या दिवशी या मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना असतो त्यादिवशी संपूर्ण परिसर निळा झालेला असतो. वानखेडेच्या बरोबरीने हाकेच्या अंतरावर असणाऱ्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयपीएलचे सामने झाले आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामात क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने सामन्यांचं आयोजन करण्यास नकार दिला. सामन्याच्या दिवशी पॅव्हेलियन संघांकडे सुपुर्द करावं असं आयपीएल प्रशासनाचं म्हणणं होतं. क्लब सदस्यांना विनाशुल्क सामने पाहायला मिळतात. पॅव्हेलियन संघांना दिल्यास क्लब सदस्यांना अन्यत्र बसून सामने पाहावे लागतील. असं करण्यास सीसीआयने नकार दिला. २००९ मध्ये राजस्थान रॉयल्सने जयपूरच्या बरोबरीने दुसरा पर्याय म्हणून ब्रेबॉर्नच निवड केली होती मात्र पॅव्हेलियनच्या मुद्यावरचा तिढा सुटू न शकल्याने राजस्थानने इथे सामने न खेळण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या कारणास्तव २००९ हंगामाचे सगळे सामने दक्षिण आफ्रिकेत झाले.

२०१० मध्ये तिढा सुटला आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचे सात सामने खेळवण्यात आले. २०१४ मध्ये एलिमिनेटरचा मुंबई-चेन्नई सामना या मैदानावर खेळवण्यात आला. हा सामना चेन्नईने जिंकला. २०१५ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे काही सामने याठिकाणी खेळवण्यात आले. २०२२ मध्ये कोरोना नियमावली लक्षात घेऊन संपूर्ण आयपीएल हंगाम मुंबई-पुण्यातच आयोजित करण्यात आला. बायोबबल आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर तब्बल १६ सामने खेळवण्यात आले.

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम हा महिला क्रिकेटचा बालेकिल्ला म्हणून नावारुपाला आलं आहे. मल्टीस्पोर्ट्स हब म्हणूनही या स्टेडियमचा वापर होतो. या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवण्यात आलं नसलं तरी आयपीएल संघांनी या स्टेडियमवर असंख्य सामने खेळवले आहेत. पहिल्यावहिल्या आयपीएल हंगामाची फायनल याच मैदानावर खेळवण्यात आली होती. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला नमवत इतिहास घडवला. २०१० मध्ये या मैदानावर सहा सामने झाले. २०११ मध्ये या मैदानावर सात सामने खेळवण्यात आले.

पुण्याजवळच्या गहुंजे इथल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं मैदान हे पुणे वॉरियर्स संघाचं होमग्राऊंड होतं. चेन्नई, राजस्थान संघांवर बंदीची कारवाई झाली त्यावेळी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा समावेश झाला. त्या संघाचं होमग्राऊंडही हेच होतं. त्यामुळे या मैदानावर नियमित सामने व्हायचे. मात्र आता पुण्याचा संघ नसल्याने प्रमाण एकदमच कमी झालं आहे. २०२२ हंगामात बायोबबल लक्षात घेऊन मुंबईपुण्यातच सगळे सामने झाले होते त्यावेळी या मैदानाला पसंती देण्यात आली.

राज्याची उपराजधानी नागपूर इथेही आयपीएलचे सामन झाले आहेत. २०१० हंगामात डेक्कन चार्जर्स संघाने नागपूर इथे काही सामने खेळण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धा मार्च ते मे या कालावधीत होते. या काळात नागपूरचं तापमान प्रचंड उष्ण असतं. त्यामुळे इथे सामने खेळवण्याला प्राधान्य देण्यात येत नाही.

वायझॅग झालं केंद्र

विशाखापट्टणम शहराचा संघ नसला तरी या मैदानावर आयपीएलचे सामने नियमितपणे होतात. २०१२ मध्ये डेक्कन चार्जर्स संघाने काही सामने या मैदानावर खेळण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये सनरायझर्स हैदराबादनेही काही सामन्यांसाठी याच मैदानाची निवड केली. २०१६ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघांनी काही सामने या मैदानावर खेळले. त्यावर्षी राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. एकीकडे तीव्र पाणीटंचाई असताना मैदानांसाठी एवढं पाणी देण्यावर प्रचंड टीका झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुंबई-पुणे संघांचे सामने राज्याबाहेर खेळवण्यात आले. २०१९ मध्ये सनरायझर्स संघाने इथे एक सामना खेळला. २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सामने इथे झाले.

हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं धरमशालाचं मैदान जगातल्या सुंदर मैदानांपैकी एक आहे. पंजाब किंग्ज संघाचे काही सामने धरमशाला इथे होतात. २३,००० प्रेक्षक क्षमता असणाऱ्या या मैदानावर खेळणं हा नितांतसुंदर अनुभव असतो असं खेळाडू आवर्जून सांगतात.

२०१६ मध्ये राजकोट इथलं निरंजन शहा स्टेडियम हे गुजरात लायन्स संघाचं होमग्राऊंड होतं. राजस्थान आणि चेन्नई संघांवर फिक्सिंगप्रकरणी बंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी राजस्थानऐवजी गुजरात लायन्स असा संघ तयार करण्यात आला. या संघाचे ५ सामने या मैदानावर झाले. क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्स इथल्या प्रेसबॉक्सच्या धर्तीवर राजकोटच्या मैदानातही वास्तू रचना करण्यात आली आहे.

इंदूर इथलं होळकर स्टेडियम हे कोची टस्कर्स केरळा या संघाचं होमग्राऊंड होतं. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघानेही काही सामन्यांसाठी या मैदानाला पसंती दिली. ओडिशातल्या कटक इथल्या बाराबत्ती स्टेडियमवर डेक्कन चार्जर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांचे सामने झाले आहेत.

रांची आणि रायपूर आयपीएलच्या नकाशावर

महेंद्रसिंग धोनीचं गाव म्हणून प्रसिद्ध रांची इथेही आयपीएलचे सामने झाले आहेत. रांचीचा संघ नाही पण या मैदानावर आयपीएलच्या सात लढती झाल्या आहेत. रांचीप्रमाणेच रायपूर इथल्या नवा रायपूर इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचे अनेक सामने झाले आहेत. २०१३ मध्ये दिल्ली संघाने काही सामने इथे खेळले. २०१५ मध्येही दिल्लीने या मैदानाला पसंती देत दोन लढती खेळल्या. मुख्यमंत्र्यांनी दिल्ली संघाची मालक कंपनी जीएमआरला रायपूर इथे सामने खेळण्याची विनंती केली. जीएमआरने या विनंतीला मान देत या मैदानावर अनेक सामने खेळले.

कोची टस्कर्स केरळा संघ आयपीएलमध्ये एकच हंगामापुरता टिकला. त्यावर्षी कोचीतलं स्टेडियम त्यांचं होमग्राऊंड होतं. उत्तर प्रदेशातील कानपूर इथेही आयपीएलचे चार सामने झाले आहेत. गुजरात लायन्स संघाने या मैदानाला पसंती दिली होती. राजस्थान रॉयल्स संघ नियमितपणे काही सामने गुवाहाटीत खेळतो. संघाचा कर्णधार रियान पराग आसामचा आहे. त्यामुळे राजस्थानला गुवाहाटीत मोठा पाठिंबा मिळतो.

आफ्रिका आणि युएईत आयपीएलचा डंका

२००९ मध्ये देशातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचा अख्खा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला. यामुळे किंग्समीड डरबान, सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन, वाँडरर्स स्टेडियम जोहान्सबर्ग, न्यूलँड्स केपटाऊन, सेंट जॉर्जेस पार्क क्वेबेखा, बफेलो पार्क ईस्ट लंडन, डायमंड ओव्हल किंबर्ले आणि मॉन्गांग ओव्हल ब्लोमफाऊंटन अशा आफ्रिकेतील सगळ्या प्रमुख मैदानांवर आयपीएलचे सामने झाले.

कोरोनाने देशात कहर माजवलेला असताना आयपीएलचे सामने युएईत खेळवण्यात आले. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, झायेद क्रिकेट स्टेडियम अबू धाबी, शारजा क्रिकेट स्टेडियम इथे आयपीएलचे सामने खेळवण्यात आले.