यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत आधी झालेल्या अन्य कुठल्याही वर्ल्डकपच्या तुलनेत सर्वाधिक स्थलांतरित खेळाडू आहेत. क्रीडाजगताचा कुंभमेळा असं वर्णन होणाऱ्या या स्पर्धेत १२४८ खेळाडू सहभागी होत आहेत. यापैकी २५ टक्के म्हणजे ३००हून अधिक खेळाडू ज्या देशात त्यांचा जन्म झाला आहे त्याऐवजी वेगळ्या देशाकडून खेळत आहेत.
चार वर्षांपूर्वी झालेल्या २०२२ वर्ल्डकप स्पर्धेत मोरोक्को एवढी वाटचाल करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ते २२व्या क्रमांकावर होते. राऊंड ऑफ १६च्या पुढे त्यांनी मजल मारली नव्हती. पण त्यांनी बेल्जियम, स्पेन आणि पोर्तुगालला चीतपट केलं. हे तिन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप१० मध्ये तेव्हाही होते आणि आताही आहेत. सेमी फायनलमध्ये धडक मारण्याची किमया मोरोक्कोने केली.
मोरोक्कोचा प्रवास स्तिमित करणारा होता. दमदार खेळाच्या बळावर त्यांनी ही प्रगती केली. मात्र त्यांच्या फुटबॉल प्रवासापेक्षा त्यांचे खेळाडू नेमके कुठले यावरून चर्चा झडल्या होत्या. २६ सदस्यीय संघापैकी १४ खेळाडू हे अन्य देशात जन्मलेले होते. अन्य कोणत्याही संघाच्या तुलनेत हे प्रमाण लक्षणीय असं होतं.
२०२६ वर्ल्डकपचं हेच वैशिष्ट्य आहे. यंदाच्या स्पर्धेत आधीच्या कोणत्याही वर्ल्डकपच्या तुलनेत सर्वाधिक खेळाडू जन्मदात्या देशाऐवजी वेगळ्या देशाकडून खेळत आहेत. काही संघांमध्ये हे प्रमाण प्रचंड आहे. क्युराको हा टिंबाएवढ्या देशाच्या संघातले ९६ टक्के खेळाडू विदेशात जन्मलेले आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो संघाचं हे प्रमाण ८५ तर मोरोक्कोचं ७३ टक्के आहे. वर्ल्डकप स्पर्धेत ४८ संघ आहेत. स्थलांतरित खेळाडूंचं प्रमाण यंदा प्रचंड आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
वर्ल्डकप आणि स्थलांतरित खेळाडू हा ऋणानुबंध जुनाच असा. १९३८ साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत १२ टक्के खेळाडू ज्या देशात जन्मले त्याऐवजी वेगळ्या देशाकडून खेळले होते. १९६२ पर्यंत फिफाने खेळाडूंसाठी पात्रता निकष लागू केले नव्हते. त्यामुळे एकापेक्षा दोन देशांकडून खेळणं सहज शक्य होतं. खेळाडू ज्या देशात जन्मला त्याऐवजी दुसऱ्या देशाच्या संघाकडून खेळतात याचं एक कारण म्हणजे त्यांच्या पालकांपैकी एक अन्य देशाचा असू शकतो. तसं असेल तर अन्य देशाकडून खेळण्याची संधी मिळते. स्थलांतरितांचा एक जत्थाच एखाद्या देशात जाऊन थडकतो त्याच लाटेत खेळाडूही असतात.
२०१८ वर्ल्डकप स्पर्धेत, इव्हान रॅकिटिकचं उदाहरण अनोखं होतं. इव्हानचा जन्म स्वित्झर्लंडचा पण तो क्रोएशियाकडून खेळला. गेल्या वर्षी त्याने एका मुलाखतीत यासंदर्भात सांगितलं. माझा जन्म, बालपण स्वित्झर्लंडमध्ये गेलं. पण क्रोएशियाकडून खेळण्याची मला संधी होती. मनाने क्रोएशियाचा कौल दिला, मी त्या संघाकडून खेळलो.
काही खेळाडू अन्य देशात जाऊन स्थायिक होतात. त्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी काही वर्ष तिथे राहणं आवश्यक असतं. तो टप्पा पार केला की त्या देशाकडून खेळता येतं. पेपेचं उदाहरण असंच काहीसं. त्याचा जन्म ब्राझीलमधला. पण तो २०१० आणि २०२२ या कालावधीत चार वर्ल्डकप पोर्तुगालकडून खेळला. २४व्या वर्षी तो पोर्तुगालचा नागरिक झाला.
विदेशात जन्मलेले खेळाडू हा एक भाग झाला. वर्ल्डकप संघात स्थलांतरितांच्या दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. २०१८ वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी झालेल्या फ्रान्स संघाचं उदाहरण चपखल ठरावं. फ्रान्सच्या २३ सदस्यीय संघापैकी १२ खेळाडूंचे पालक आफ्रिकेचे होते. असं असणं अनोखं नाही. फ्रान्सच्या वसाहती आणि त्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या घडामोडी हे यामागचं कारण आहे. २०००च्या मध्यापासून स्वित्झर्लंडच्या संघात युगोस्लाव्हियाच्या खेळाडूंचा सहभाग वाढता आहे. युएसएसआरच्या विघटनानंतर युगोस्लाव्हियातून अनेक माणसं स्वित्झर्लंडमध्ये जाऊन स्थायिक झाली.
इंग्लंडच्या यंदाच्या संघाची गोष्टही फार वेगळी नाही. मार्क गुइहीचा जन्म आयव्हरी कोस्ट या देशात झाला आहे मात्र तो इंग्लंडकडून खेळतो आहे. याव्यतिरिक्त ९ खेळाडू असे आहेत ज्यांचे पालक अन्य देशात जन्मलेले आहेत. ब्रिटिशांच्या वसाहती असलेल्या म्हणजेच आफ्रिका, आशियाई उपखंड तसंच कॅरेबियन बेटसमहून इथे या मंडळींचा जन्म झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेकांनी युकेत आश्रय घेतला होता. याची एक दुसरी बाजू म्हणजे इंग्लंडमध्ये जन्मलेले २४ जण वर्ल्डकपमध्ये अन्य देशांकडून खेळत आहेक. यापैकी पाचजण स्कॉटलंडकडून तर अन्य अमेरिका, न्यूझीलंड, घाना या संघांकडून खेळत आहेत.
देश कुठला याचा खेळण्यावर परिणाम होतो का?
स्थलांतरित खेळाडूंचा जास्त भरणा असलेल्या संघांची कामगिरी चांगली होते अशा स्वरुपाचं संशोधन फारसं झालेलं नाही. पण थोडंबहुत जो डेटा उपलब्ध आहे तो सकारात्मक आहे. १९७० ते २०१८ या कालावधीत झालेल्या वर्ल्डकप संघांचा अभ्यास करण्यात आला. अन्य देशातल्या खेळाडूंचा समावेश असलेले संघ चांगली कामगिरी करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. सरासरी पाहिली तर एक अतिरिक्त अन्य देशात जन्मलेला खेळाडू अतिरिक्त एका सामन्याशी निगडीत आहे.
ज्या देशातून खेळाडू स्थलांतरित झालेत आणि ज्या देशात स्थायिक झालेत यांच्यात कोणतंही साधर्म्य नसतानाही कामगिरी उंचावत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर्थिक सुबत्ता तसंच फुटबॉलची परंपरा यापल्याड खेळाडूंना स्थलांतरामुळे फायदा होत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
२०२३ मध्ये झालेल्या एका संशोधनासाठी १९७० ते २०१८ मधील युरोपातील राष्ट्रीय संघांचा अभ्यास करण्यात आला. खेळाडूंचं मूळ कळण्यासाठी त्यांच्या आडनावाचा आधार घेण्यात आला. यातून ते किती विविधांगी पार्श्वभूमीतून आलेत ते कळलं. ज्या संघांमध्ये वंश-जातपात-धर्म-पंथ यांचं वैविध्य आहे त्या संघांची कामगिरी चांगली झाली असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
वैविध्य असण्याचा एक निकष मांडला गेला. गोल डिफरन्स अर्थात (संघाने केलेल्या गोलची संख्या वजा संघाने होऊ दिलेल्या गोलची संख्या) यामध्ये ज्या संघांकडे वैविध्य पार्श्वभूमीचे खेळाडू आहेत त्यांचं हे प्रमाण चांगलं आहे. दोन घटक यामागचं कारण उलगडतात.देशात होणाऱ्या स्थलांतरामुळे राष्ट्रीय संघासाठी अधिकाअधिक खेळाडू उपलब्ध होतात. घानाचा संघ हे याचं उत्तम उदाहरण. पश्चिम युरोपातल्या … समाजाचे खेळाडू घाना संघात दिसतात. दर्जेदार फुटबॉल संरचना असलेल्या व्यवस्थेत तयार झालेले असे हे खेळाडू दुसऱ्या देशाच्या संघाला उपलब्ध होतात.
स्थलांतरामुळे संघाला अतिरिक्त आणि नवी कौशल्यं अंगी असणाऱ्या खेळाडूंचा उपलब्धता. फुटबॉल खेळण्यासाठी विशिष्ट असं शारीरिक कौशल्य आवश्यक असतं. सेंट्रल डिफेंडर्स उंच आणि हट्टेकट्टे असतात. आक्रमण करणाऱ्या खेळाडूंना वेगवान असणं आवश्यक असतं. लोकसंख्या जेवढी विविधांगी तेवढं अनेकविध कौशल्य असलेल्या खेळाडूंची फौज निवडीसाठी उपलब्ध होते. निवडसमितीला पर्याय मिळतात. एकाच खेळाडूवर अवलंबून राहण्याऐवजी लाईक अ लाईक रिप्लेसमेंट असे खेळाडू संघात असू शकतात.
या सगळ्याचा अर्थ स्थलांतरितांमुळे एखाद्या संघाला वर्ल्डकप जिंकता येतो असं नाही. अर्जेंटिनाने २०२२ मध्ये अन्य देशात जन्मलेल्या एकाही खेळाडूविना वर्ल्डकपवर नाव कोरलं. लोकसंख्येचा आकार, आर्थिक स्थैर्य, संसाधनांची उपलब्धता यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. लिओनेल मेस्सीसारखा जादुई किमयागार खेळाडू तुमच्या ताफ्यात असेल तर जिंकणं सोपं होतं.
स्थलांतराच्या प्रक्रियेमुळे आंतरराष्ट्रीय संघांना फायदा होतोय का? हे सध्या संशोधनाद्वारे किंवा डेटाद्वारे सिद्ध करता आलेलं नाही. यासंदर्भात काही संशोधनं झाली आहेत पण तूर्तास पायाभूत म्हणता येईल असं ठोस संशोधन झालेलं नाही. पण याकडे एका दुसऱ्या चष्म्यातून पाहणं आवश्यक आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये धडक मारणाऱ्या मोरोक्को संघात फक्त तिथेच जन्मलेले खेळाडू असते तर त्यांनी एवढी भरारी घेतली असती का? यंदा क्युराको संघाकडे अशी संधी आहे. फुटबॉलच्या यशात स्थलांतरितांचा वाटा
