टी-२० विश्वचषक २०२६ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. सेमीफायनलसाठीचे ३ संघ ठरले असून आता २ संघांमध्ये अखेरच्या स्थानासाठी चुरशीची लढत होणार आहे. याशिवाय इतर ४ संघ सुपर-८ टप्प्यातून बाहेर पडले आहेत. ज्यापैकी एक असलेल्या पाकिस्तान संघाची टी२० विश्वचषकात फारशी प्रभावी नव्हती. जिथे सुपर-८ फेरीत त्यांना फक्त १ सामना जिंकता आला. वर्ल्डकपमधून बाहेर पडूनही पाकिस्तान क्रिकेट संघाला आयसीसीकडून चांगली रक्कम मिळणार आहे.
टी-२० विश्वचषक सुपर-८ टप्प्यानंतर आता पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाब्वे हे संघ बाहेर पडले आहेत. आयसीसीच्या बक्षीस रकमेच्या धोरणानुसार, सर्व सहभागी संघांना स्वतंत्र बक्षिसे दिली जातात. पाकिस्तानच्या संघालाही कोट्यवधी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
शनिवारी २८ फेब्रुवारीला श्रीलंकेविरूद्धच्या अखेरच्या सुपर-८ सामन्यात गणितीय समीकरणांनुसार पाकिस्तानने विजय मिळवला असता तर त्यांना सेमीफायनल गाठण्याची संधी होती. पाकिस्तानला श्रीलंकेचा ६३ धावांनी पराभव करण्याची गरज होती, पण संघाला फक्त ५ धावांनी विजय मिळवता आला, दासून शनाकाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची अखेरच्या षटकांत धुलाई केली. त्यामुळे पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपलं.
आयसीसीकडून अद्याप बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. पण २०२४ मधील टी-२० विश्वचषकाच्या तुलनेत २० टक्के अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. विजेत्या संघाला अंदाजे २७.५ कोटी रूपये बक्षिसाची रक्कम मिळू शकते. तर उपविजेत्या संघाला १४.६५ कोटी मिळू शकतात. सुपर ८ मधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघ ५ आणि ८ व्या स्थानादरम्यान आहे, त्यामुळे त्यांना आयसीसीकडून ३.८ लाख अमेरिकन डॉलर्स सुमारे ३.५ कोटी रुपये बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम स्पर्धेत खेळण्यासाठी आणि सुपर-८ पर्यंत पोहोचण्यासाठी संघाला दिली जाईल.
याशिवाय संघाने स्पर्धेत एकूण ४ सामने जिंकले. प्रत्येक विजयासाठी आयसीसीकडून सुमारे २६ ते २८ लाख रुपये बोनस मिळत असल्याने या विजयांमधून साधारण १.०४ ते १.१९ कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई होणार आहे. यासह पाकिस्तान क्रिकेटच्या खात्यात जवळपास ८ लाखांची मोठी बक्षिस रक्कम जमा होऊ शकते.
पाकिस्तानने स्पर्धेची सुरुवात नेदरलँड्सविरूद्ध ३ विकेट्सने विजय मिळवून केली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेवर ३२ धावांनी विजय मिळवला, परंतु भारताविरुद्ध त्यांना ६१ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पाकिस्तानने त्यांचा शेवटचा गट सामना जिंकून सुपर-८ फेरीत प्रवेश केला. पण सुपर ८ फेरीत त्यांची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नाही. न्यूझीलंडविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर, इंग्लंडने त्यांचा २ विकेट्सने पराभव केला, ज्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशांना मोठा धक्का बसला. श्रीलंकेविरूद्ध विजय मिळवला असला तरी नेट रन रेटमुळे संघ सेमीफायनल गाठू शकला नाही.
