BCCI Pension Policy: काही दिवसांपू्र्वीच भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे पु्न्हा एकदा बीसीसीआयकडून दिल्या जाणाऱ्या पेन्शनचा मुद्दा चर्चेत आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या भारतीय खेळाडूंना किती पेन्शन दिलं जातं? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. तर खेळाडूंना मिळणारं पेन्शन हे त्यांनी किती सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे, यावर अवलंबून असते. दरम्यान अजिंक्य रहाणेला किती पेन्शन मिळणार? जाणून घ्या.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांपैकी एक आहे. जे जगातील इतर कुठल्याही क्रिकेट बोर्डाला जमलं नाही, ते बीसीसीआयने करुन दाखवलं. बीसीसीआय हे जगातील एकमेव क्रिकेट बोर्ड आहे, जिथे खेळाडूंना निवृत्तीनंतर पेन्शन दिलं जातं. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांपैकी एक आहेत. पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून निवृत्ती जाहीर केलेल्या खेळाडूंना पेन्शन दिली जात नाही.
रहाणेला बीसीसीआयकडून किती पेन्शन मिळणार?
रहाणे भारतीय संघातील अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. त्याला २५ हून अधिक कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे १ जून २०२२ पासून लागू करण्यात आलेल्या पॉलिसीनुसार ,रहाणेला दरमहा ७०, ००० रुपये पेन्शन दिलं जाणार आहे.
बीसीसीआयमध्ये पेन्शनच्या किती श्रेणी आहेत?
२५ किंवा त्याहून अधिक सामने खेळलेल्या माजी क्रिकेटपटूंना दरमहा ७०,००० रुपये दिले जातात.
२५ पेक्षा कमी कसोटी सामने खेळलेल्या माजी खेळाडूला ६०,००० रुपये दिले जातात.
माजी भारतीय महिला आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दरमहा ५२,५०० रुपये दिले जातात.
२००३ आधी निवृत्त झालेले पात्र प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना ४५,५०० रुपये दिले जातात.
इतर पात्र प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना ३०,००० रुपये पेन्शन दिलं जातं.
मुख्य बाब म्हणजे ही पेन्शन केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना दिली जात नाही, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू देखील या पेन्शनसाठी पात्र असतात.देशासाठी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदत मिळत राहावी म्हणून ही पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. बीसीसीआयने ही योजना २००४ मध्ये सुरु केली होती. त्यावेळी १७४ माजी खेळाडूंना आणि अधिकाऱ्यांना ५००० रुपये पेन्शन दिलं जायचं. २०२२ नंतर पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे.
