एकेकाळी आपल्या तुफान फटकेबाजीसाठी आणि हटके स्टाईलसाठी चर्चेत असणार विनोद कांबळी आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. विनोद कांबळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका वृद्धाक्षमात असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच क्रिकेट चाहते चिंता व्यक्त करताना दिसून येत आहेत. विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याशी आणि आर्थिक परिस्थितीशी झुंज देत आहे. दरम्यान त्याला बीसीसीआयकडून किती पेन्शन दिली जाते? जाणून घ्या.

विनोद कांबळीने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. यादरम्यान त्याने दमदार शतकंही झळकावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेल्या प्रत्येक माजी खेळाडूला बीसीसीआयकडून पेन्शन लागू होते. त्यामुळे विनोद कांबळीलाही बीसीसीआयकडून पेन्शन मिळते. माध्यमातील वृत्तानुसार, विनोद कांबळीला बीसीसीआयकडून दरमहा ३० हजार रूपये पेन्शन मिळते. पण ही पेन्शन घर चालवण्यासाठी पुरेशी नाही. काही वर्षांपूर्वी त्याने नोकरीची मागणी केली होती. त्यावेळी अनेकांनी पुढाकार घेऊन त्याला नोकरी ऑफर केली होती.

विनोद कांबळीने १९९३ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. शालेय क्रिकेटमध्ये त्याने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत मिळून विक्रमी ६०० हून अधिक धावांची भागीदारी केली होती. हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणालाच मोडता आलेली नाही. १९९३ मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याला १७ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १०८४ धावा केल्या. मुख्य बाब म्हणजे, त्याने इंग्लंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सुरूवातीच्या ४ कसोटी सामन्यांमध्ये त्याने सलग द्विशतकं झळकावली.

ज्यावेळी तो क्रिकेटच्या मैदनावर तुफान कामगिरी करत होता, त्यावेळी त्याची एकूण संपत्ती १२ ते १३ कोटी रूपये इतकी होती. पण सध्या त्याला केवळ ३० हजार रुपये मिळत आहेत. बीसीसीआयकडून किती मानधन मिळणार, हे त्या खेळाडूने भारतासाठी किती सामने खेळले आहेत, यावर अवलंबून असतं. विनोद कांबळीने भारतीय संघासाठी २५ हून कमी कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याला ३० हजार रूपये पेन्शन मिळते.

विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याबाबत बोलताना निदान द मुक्ती वृद्धाश्रमाचे संस्थापक महेश नाईक म्हणाले की, “जेव्हा तो आमच्यासोबत असतो, तेव्हा तो नेहमी आनंदी आणि उत्साही असतो. खरं तर, ज्या आकृती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते, त्यांनीच त्याला आमच्याकडे पाठवलं होतं. “विनोद कांबळी आमच्यासाठी हिरो आहे. त्याला आयुष्यभरात जेव्हा कधी आमच्याकडे राहावंसं वाटेल, तेव्हा तो हवं तितके दिवस इथे राहू शकतो, तेही पूर्णपणे मोफत. त्याच्या उपचारांचा खर्चही आम्हीच उचलू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आमच्या हिरोप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय, याचा आम्हाला आनंद आहे.”