Womens T20 World Cup 2026 Prize Money: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा टी-२० विश्वचषकातील दबदबा कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा लॉर्ड्सच्या मैदानावर ७ विकेट्सने पराभव करत स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा महिला टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाने सांघिक कामगिरीच्या बळावर हा ऐतिहासिक विजय नोंदवला. विजयानंतर संघाला कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली.
आयसीसीने (ICC) या महिला टी-२० विश्वचषकासाठी बक्षीस रकमेत वाढ केली होती; या स्पर्धेत प्रथमच १२ संघांनी सहभाग घेतला होता. १२ संघांच्या सहभागामुळे, बक्षीस रक्कम २०२४ च्या विश्वचषकातील ७.९५ दशलक्ष डॉलर्सवरून वाढवून ८.७६ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ८३.४० कोटी रुपये करण्यात आली. मात्र, विजेत्या आणि उपविजेत्या संघांसाठीची बक्षीस रक्कम मात्र बदलली नाही आणि ती २०२४ च्या टी-२० विश्वचषकाप्रमाणेच कायम राहिली.
ऑस्ट्रेलिया संघाला बक्षीसाची किती रक्कम मिळाली?
आयसीसीने यावेळी बक्षीस रकमेत १० टक्क्यांनी वाढ केली होती. ऑस्ट्रेलियाला २३,४०,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे २२ कोटी रुपये मिळाले. याव्यतिरिक्त, उपविजेत्या इंग्लंडला ११,७०,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ११ कोटी रुपये बक्षीसाची रक्कम मिळाली आहे. याव्यतिरिक्त, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना आयसीसीने (ICC) सुमारे ६.२९ कोटी रुपये दिले आहेत. दरम्यान, गट फेरीतील प्रत्येक विजयासाठी सर्व संघांना २९ लाख रुपये मिळाले. तसेच, सहभागी सर्व संघांना सुमारे २.३५ कोटी रुपये मिळाले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ४ गडी बाद १५० धावा केल्या. नॅट सायव्हर-ब्रंट ही इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली; तिने ५३ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. या कामगिरीसह, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात ५० किंवा त्याहून अधिक धावांच्या सर्वाधिक खेळी करणारी ती खेळाडू बनली. तिने नऊ वेळा ५० हून अधिक धावांच्या खेळी केल्या आहेत. याव्यतिरिक्त, फ्रेया केम्पने २८ चेंडूंत ४४ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने वादळी फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियासाठी बेथ मूनीने सर्वाधिक धावा केल्या. तिने ४९ चेंडूंत ६४ धावांची शानदार खेळी केली. तसेच, फोबी लिचफील्डने ३५ चेंडूंत ४८ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. अशा प्रकारे, ऑस्ट्रेलियाने अवघ्या १७.१ षटकांत ७ गडी राखून विजेतेपदाचा सामना जिंकला.
