Mumbai Indians Playoff Qualification Scenario After MI vs CSK Match: आयपीएलच्या जेतेपदावर पाच वेळा आपलं नाव कोरलेल्या संघाला शनिवारी चेन्नई सुपर किंग्सकडून मोठा पराभव सहन करावा लागला, जो आयपीएल २०२६ मधील त्यांच्या नऊ सामन्यांतील सातवा पराभव ठरला. या निकालामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या मुंबईच्या आशांना मोठा धक्का बसला असून, पाच वेळा विजेते ठरलेला हा संघ सध्या नऊ सामन्यांत फक्त चार गुणांवर आहे. मुंबईला आता प्लेऑफ गाठण्यासाठी काय करावं लागणार, जाणून घेऊया.

मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानी असून संघाचे ९ सामन्यांमध्ये ४ गुण आहेत. तर संघाचा नेट रन रेट -०.८०३ इतका आहे. यानंतरही हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाकडे अजूनही गणितीय समीकरणानुसार प्लेऑफ गाठण्याची संधी शिल्लक आहे. लीग टप्प्यातील उर्वरित पाच सामने जिंकले, तर मुंबई इंडियन्स जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात.

मुंबई इंडियन्सला प्लेऑफ गाठण्यासाठी काय करावं लागणार?

आयपीएलचा इतिहास पाहता काही संघ १४ गुणांवर असतानाही प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. पण १० संघांच्या स्पर्धेत १६ गुण हा सुरक्षित टप्पा मानला जातो. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या हातात परिस्थिती पूर्णपणे नसली तरी त्यांना उर्वरित पाचही सामने जिंकावे लागतील आणि इतर निकाल त्यांच्या बाजूने लागण्याचीही अपेक्षा ठेवावी लागेल.

याशिवाय, केवळ विजय मिळवणं पुरेसं नाही, तर मोठ्या फरकाने जिंकून नेट रनरेट सुधारण्याचीही गरज आहे, कारण त्यांचा सध्याचा नेट रन रेट स्पर्धेतील सर्वात खालच्या स्तरावर आहे. सध्या पंजाब किंग्स ८ सामन्यांत १३ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे तिन्ही संघ १२ गुणांसह प्लेऑफच्या जवळपास आहेत आणि त्यांच्यातील फरक फक्त नेट रनरेटचा आहे.

मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स – ४ मे
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स – १० मे
पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स – १४ मे
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – २० मे
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – २४ मे

प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला केवळ स्वतःचे सामने जिंकणे पुरेसे नाही, तर सध्याच्या टॉप-४ संघांपैकी किमान तीन संघांनी उर्वरित लीगमध्ये सातत्याने विजय मिळवणं आवश्यक आहे, जेणेकरून १४ गुणांपेक्षा जास्त गुण फक्त चार संघांकडेच राहतील. याशिवाय, जर मुंबई इंडियन्सला ४ मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला, तर त्यांचे प्लेऑफमध्ये जाण्याचे गणितीय समीकरणही पूर्णपणे संपुष्टात येतील.