Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सने १३ वर्षांनंतर आयपीएलमधील सलामीचा सामना जिंकत मोहिमेला सुरूवात केली. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२६ हंगामाची सुरुवात विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक म्हणून केली होती. मात्र पहिला सामना जिंकल्यानंतर पाच वेळचा चॅम्पियन ठरलेल्या या संघाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. सलग तीन पराभवांनंतर आता मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचं गणित कसं असणार जाणून घेऊया.

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजयाने सुरुवात केली, पण त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध संघाला सलग तीन सामने गमावावे लागले. सध्या संघ मोठ्या अडचणीत सापडलेला दिसत आहे. तरीही स्पर्धेचा अर्ध्याहून अधिक टप्पा अजून बाकी असल्याने त्यांच्याकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी अजूनही आहे.

मुंबई इंडियन्सला प्लेऑफ गाठण्यासाठी काय करावं लागणार?

आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत टॉप-४ मध्ये स्थान मिळवणं आवश्यक आहे. साधारणपणे प्लेऑफसाठी १६ गुणांची गरज असते, म्हणजेच किमान ८ सामने जिंकावे लागतात. मुंबईने आतापर्यंत ४ पैकी १ सामना जिंकला असून अजून १० सामने अद्याप बाकी आहेत. या उर्वरित १० सामन्यांपैकी किमान ७ सामने जिंकणं त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे, तरच ते १६ गुणांपर्यंत पोहोचून पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकतात.

आयपीएल २०२५ मध्येही मुंबई इंडियन्सची सुरुवात अशीच खराब झाली होती. मात्र त्यानंतर त्यांनी सलग विजयांची मालिका रचत जोरदार पुनरागमन केलं आणि १६ गुणांसह चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्यामुळे यंदाही उशिरा का होईना, ते दमदार पुनरागमन करू शकतात, अशी आशा नक्कीच आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २४० धावांचा मोठा डोंगर उभारला. फिल सॉल्टने ३६ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या, तर रजत पाटीदारने फक्त २० चेंडूंमध्ये ५३ धावांची तुफानी खेळी केली. विराट कोहलीनेही ५० धावांची अर्धशतकी खेळी साकारली. शेवटच्या षटकांत टीम डेविडने १६ चेंडूंमध्ये ३४ धावा करत आक्रमक फलंदाजीने संघाला २४० धावांचा पल्ला गाठून दिला.

२४१ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला चांगल्या सुरूवातीनंतर मोठा धक्का बसला, कारण रोहित शर्मा सहाव्या षटकात दुखापतीमुळे १९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. रायन रिकल्टन (१७ चेंडूंमध्ये ३२), हार्दिक पांड्या (२१ चेंडूंमध्ये ४१) आणि सूर्यकुमार यादव (२२ चेंडूंमध्ये ३३) यांनी चांगली सुरुवात केली, पण ते मोठ्या खेळीत रूपांतरित करू शकले नाहीत.

शेरफेन रदरफोर्डने ३१ चेंडूंमध्ये ७१ धावांची खेळी करत आयपीएलमधील आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सुयश शर्माने आपल्या पहिल्याच षटकात दोन बळी घेत सामना फिरवला. अखेरीस मुंबई इंडियन्स २२२ धावांपर्यंतच पोहोचू शकली आणि १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.