कलाकार आणि शूटिंग यांचा संबंध नेहमीचाच पण नाना पाटेकरांच्या संदर्भात शूटिंग म्हणजे केवळ चित्रीकरण असं नव्हतं. शूटिंग अर्थात नेमबाजी खेळावर त्यांचा जीव होता. एकाग्रता, दृष्टी आणि दमसास यांची कसोटी पाहणाऱ्या खेळात नानांनी प्राविण्य मिळवलं. केवळ आवड यापुरतं मर्यादित न राहता ते नेमबाज झाले. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. हिंदी-मराठी विश्वात अतिशय व्यग्र असतानाही नानांनी नेमबाजीचा ध्यास जपला.
राष्ट्रीय पुरस्कारविजेते नाना हे व्यावसायिक नेमबाज होते. राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय पातळीवरील स्पर्धांमध्ये ते सहभागी व्हायचे. वयाच्या चाळिशीत नाना आणि नेमबाजीचं सख्य जमलं. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना नानांनी नेमबाजाशी ऋणानुबंध कसा जोडला गेला ते सांगितलं होतं. २०११ मध्ये मी नेमबाजी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणा होतो. तिथून या खेळाची गोडी लागली. सरावाला जाऊ लागलो. अनेक बंदुकींच्या माध्यमातून सराव करू लागलो. मला हा खेळ जमू लागला.
२००१ मध्ये पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना नाना स्पर्धात्मक पातळीवर नेमबाज म्हणून सहभागी होऊ लागले. ५० मीटर रायफल प्रोन तसंच ३०० मीटर बिग बोर प्रकारातून ते खेळायचे. पुण्यातल्या बालेवाडी संकुलात आणि भोपाळमधल्या मऊ इथल्या नेमबाजी केंद्रात ते सराव करायचे. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रहार चित्रपटातील भूमिकेसाठी नानांनी लष्करी प्रशिक्षण घेतलं. त्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना नेमबाजीची ओळख झाली होती.
२००४ मध्ये इंदूर इथे झालेल्या ४८व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत नानांनी ३०० मीटर बिग बोर प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरलं. तीन वर्षांनंतर नानांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने सांघिक कांस्यपदक मिळवलं. ६००पैकी त्यांनी ५४९ गुण मिळवले. ४९ स्पर्धकांमध्ये ते १३व्या स्थानी होते. २००७ मध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या त्यांच्या प्रदर्शनामुळे त्यांना renowned shot अशी बिरुदावली पटकावली. मला ही नवी रायफल मिळू दे, ६०० पैकी ५९० गुण मिळवून दाखवतो असं नाना म्हणाले होते.
साठीपर्यंत नाना राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धांमध्ये नियमित सहभागी व्हायचे. त्यानंतर देशातल्या विविध नेमबाजी केंद्रांमध्ये जाऊन ते आवर्जून सराव करायचे. चित्रीकरणादरम्यान ते नेमबाजीचं साहित्य बरोबर बाळगायचे. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा ते नेमबाजीचा सराव करायचे.
ऑलिम्पिक स्पर्धेत पदकविजेत्या आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त नेमबाज गगन नारंग यांनी नेमबाजपटू नाना पाटेकरांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘काही बातम्या तुम्हाला उन्मळून टाकतात. नाना पाटेकरांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. अजूनही विश्वास बसत नाहीये. नानाजींबद्दल असं व्यक्त व्हावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. नेमबाजी हा आम्हा दोघांना जोडणारा समान धागा. त्यांना नेमबाजी आवडायची. त्यांचं या खेळाप्रति प्रेम निस्सीम होतं. नेमबाजांचं आयुष्य कसं असतं, त्यांच्यासमोर काय आव्हानं असतात, हा खेळ किती कठीण आहे याविषयी त्यांना सखोल जाण होती. नेमबाजी या खेळासाठी, नेमबाजांसाठी ते सदैव उपलब्ध असायचे. खेळ आणि खेळाडूंसाठी त्यांना जे करणं शक्य होतं ते त्यांनी केलं’, अशा शब्दात अव्वल नेमबाज गगन नारंग यांनी नाना पाटेकरांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.
सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये गगन लिहितात, ‘आम्ही सगळे एकत्र बसायचो. गप्पागोष्टी, धमाल चालायची. एकत्र जेवायचो. त्यांनी आमच्याकरता अतिशय प्रेमाने स्वयंपाक केला होता. एवढे मोठे कलाकार असूनही आमच्याबरोबर वावरताना कुठलाही आवेश, अभिनिवेश नसायचा. त्यांच्या साधेपणाचं आम्हाला आश्चर्य वाटायचं. त्यांचं मन अतिशय मोठं होतं. आम्ही अलीकडेच अहमदाबाद इथे भेटलो. त्यांच्या पुण्यातल्या शेतघरी भेटण्याविषयी बोलणं झालं. तिथे एकत्र नेमबाजीचा सराव करू यावरही बोलणं झालं. मला सरावासाठी अम्युनिशन दे असंही त्यांनी सांगितलं. ते मला प्रेमाने गगन्या म्हणायचे. ती आमची शेवटची भेट ठरेल असं कदापिही वाटलं नाही. काही मैत्र किती वेळा भेटलो यावर अवलंबून नसतात. तुमचं नातं किती घट्ट आहे यावरून ऋणानुबंध ठरतो. त्यांच्याबरोबरचं बोलणं मिस करेन. त्यांनी प्रेमाने स्वत: करून खिलवणं, हास्यविनोद, गप्पा आणि या सगळ्यापलीकडे उदार मनाचा जिंदादील माणूस- हे काहीच नसेल आता. तुमची उणीव प्रकर्षाने जाणवेल’.
