सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधलं दैवत. विराट कोहली हा आधुनिक दिग्गजांपैकी एक. सचिनने रचलेले विक्रम विराटला खुणावत आहेत. तिरुवनंतपुरम इथे झालेल्या लढतीत विराटने वनडेत १५,००० धावांचा टप्पा ओलांडला. या लढतीत विराटने वनडेतलं ५५वं शतक झळकावलं. सचिनच्या तुलनेत विराटने ७४ लढतींआधीच १५,००० धावांचा टप्पा ओलांडला. विराट सचिनपेक्षा श्रेष्ठ असं म्हणता येईल का? या प्रश्नाचं उत्तर जटिल आहे. कारण सचिनच्या काळात वनडे क्रिकेटचं प्रारुप अतिशय वेगळं होतं. जवळपास दोन दशकं सचिनने वनडेत अधिराज्य गाजवलं. त्यावेळी टेस्ट आणि वनडे असे दोनच प्रकार प्रामुख्याने होते. टी२० हा विषयच नव्हता.

तेंडुलकर आणि कोहली दोघेही निर्विवाद महान खेळाडू आहेत. पण दोघे खेळले तो काळ सर्वस्वी वेगळा आहे. प्रत्येक कालखंडाची आव्हानं वेगळी असतात. हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा याने त्याला मागे टाकलं अशा चर्चा योग्य ठरत नाहीत. वनडे क्रिकेटमधल्या दोघांच्या आकडेवीराचा तौलनिक अभ्यास केला तर अनेक रंजक गोष्टी समोर येतात. कोहलीच्या नावावर वनडेत ५५ शतकं आहेत. तेंडुलकरच्या नावावर १८४२६ धावा आहेत. कोहली सध्या १५०८० धावा आहेत. तो अजूनही खेळतो आहे. दमदार फॉर्मात आहे, फिट आहे. टी२०च्या आक्रमणानंतर वनडे सामन्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे सचिनचे वनडेतले आकडे पार करणे कोहलीसाठी कठीण असेल.

तेंडुलकर आणि कोहली- आकड्यांची गंमत

कोहलीने १५,००० धावांचा टप्पा ३१५व्या वनडेत पार केला. सचिनने हा टप्पा ३७७व्या वनडेत ओलांडला होता. कोहलीने १५,००० धावांसाठी सचिनच्या तुलनेत १७५८ चेंडू कमी घेतले. सचिनने १७,५२८ चेंडूत १५,००० धावांचा टप्पा पार केला. विराटने १५,९५० चेंडूत १५,००० धावा पूर्ण केल्या. विराटने सचिनच्या तुलनेत ९ टक्के चेंडू कमी खर्चून हा विक्रम प्रस्थापित केला. प्रत्येक डावात सरासरी धावांची संख्या सचिनच्या तुलनेत विराटच्या जास्त आहेत. विराटने प्रत्येक सामन्यात सरासरी ४९.५ तर सचिनने ३९.९ धावा केल्या आहेत.

विराटचं बॅटिंग अॅव्हरेज ५८.८ आहे तर सचिनचं ४४.२४ आहे. सचिन प्रामुख्याने १९९५-२०११ या काळात खेळला. तेव्हा एकूणाच धावा मर्यादित प्रमाणावर होत. हे लक्षात घेता सचिनची सरासरी दमदार अशीच आहे. सचिनचा स्ट्राईकरेट ८६ आहे तर विराटचा ९४.

१५,००० धावांचा टप्पा ओलांडताना सचिनच्या नावावर ४१ शतकं होती तर विराटच्या नावावर ५५ आहेत. गेल्या दोन दशकात वनडेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज अशी बिरुदावली पटकावलेल्या विराटने वनडेत सरासरी ५.५ डावानंतर शतक झळकावलं आहे. सचिनच्या संदर्भात ही टक्केवारी ९.२ अशी आहे.

सचिन श्रेष्ठ की विराट अशा चर्चा सोशल मीडियावर ऐकायला छान वाटतात पण दोघे कोणत्या कालखंडात खेळले ते समजून घेणं आवश्यक आहे. सचिनने कारकिर्दीत ४० ते ५० वनडे सामने असे खेळले ज्यामध्ये लाल चेंडू वापरण्यात आला होता. सकाळी हा चेंडू स्विंग होतो आणि फलंदाजी करणं कठीण होतं.

गेल्या काही वर्षात वनडे प्रकारात घाऊक बदल झाले आहेत. बरचसे नियम हे फलंदाजधार्जिणे झाले आहेत. याचा फायदा फलंदाजांनी घेतला आहे. सचिनने १८ डिसेंबर १९८९ मध्ये गुजरानवाला इथे वनडे पदार्पण केलं. विराटने २७ सप्टेंबर २०२६ रोजी १५,००० धावांचा टप्पा ओलांडला आणि वनडतेलं ५५वं शतक झळकावं. हा खूप मोठा कालावधी आहे. सचिनने खेळलेल्या ४६३ वनडेत प्रामुख्याने एकच चेंडू संपूर्ण डावात वापरण्यात आला. सचिनच्या काळात क्षेत्ररक्षणावर निर्बंध हे फक्त सुरुवातीच्या १५ षटकांसाठी लागू असत. सध्याच्या रचनेत तीन पॉवरप्ले असतात, ज्याचा फायदा फलंदाजांना मिळतो.

सचिन कारकिर्दीतील सुरुवातीच्या ६९ सामन्यात सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला नाही. साहजिकच त्याने खेळलेल्या चेंडूंची संख्या कमी होती. ७४व्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध सचिनला सलामीला जाण्याची संधी मिळाली. १८,४२६ धावांपैकी १८०० धावा सचिनने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत केल्या आहेत. त्यावेळी कमी षटकं बाकी असतात, क्षेत्ररक्षण फैलावलेले असतं. वनडेत वापरला जाणारा पांढरा चेंडू नरम पडतो आणि त्याचा रंगही विरतो. त्यामुळे तो सीमारेषेपलीकडे पिटाळण्यासाठी जास्त ऊर्जा आणि मेहनत लागते.

२०११ आणि २०१५ मध्ये वनडेचे नियम बदलण्यात आले. वनडे क्रिकेटमध्ये कोहली अढळस्थानी विराजमान होण्यात या नियमांनी मोठी भूमिका बजावली आहे. पहिला नियम म्हणजे दोन एण्ड्सना दोन चेंडू. सोप्या भाषेत सांगायचं तर एका षटकासाठी एक चेंडू. दुसऱ्या षटकाला वेगळा. एक चेंडू २५ षटकंच वापरला जातो. चेंडूचा रंग तसाच राहतो. चेंडू टणक राहतो. बॅटवर चांगल्या पद्धतीने येतो त्यामुळे जोरकस फटके लगावता येतात.

२०१४ ते २०१९ कालावधीत विराट वनडे क्रमवारीत अव्वल स्थानीच होता. २०१५ मध्ये आणखी एक बदल झाला. ११ ते ४० षटकांदरम्यान ३० गज वर्तुळाच्या बाहेर चारच क्षेत्ररक्षक तैनात केले जाऊ शकतात. सीमारेषेवर मोठे फटके अडवणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने साहजिक धावांची संख्या वाढली. सचिनने मधल्या षटकांमध्ये इतक्या खुलेपणाने फलंदाजी करण्याचं स्वातंत्र्य किंवा मोकळीक नव्हती. विराटला या दोन नियमांमुळे मुक्त फटकेबाजी करता येऊ लागली.