scorecardresearch

पाकिस्तानच्या पराभावाचा भारताला फायदा! World Test Championship च्या अंतिम फेरीचा मार्ग सुखकर; पाहा Points Table

Rawalpindi Test Pakistan loss to England: रावळपिंडी कसोटीमधील इंग्लंडच्या विजयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना ही गुड न्यूज मिळाली

पाकिस्तानच्या पराभावाचा भारताला फायदा! World Test Championship च्या अंतिम फेरीचा मार्ग सुखकर; पाहा Points Table
पाकिस्तानचा पराभव झाल्याने भारताची दावेदारी बळकट (फोटो – ट्वीटरवरुन साभार)

Rawalpindi Test Pakistan loss to England boost India chances of World Test Championship final: जेम्स अँडरसनने ३६ धावांमध्ये घेतलेले चार बळी आणि ओली रॉबिनसनने ५० धावांमध्ये घेतलेल्या चार बळींच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये पाकिस्तानवर ७४ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. रावळपिंडी येथे खेळवण्यात आलेल्या कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांचा निभाव लागला नाही. मात्र पाकिस्तानच्या या पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत) (World Test Championship final) भारताची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.

पाकिस्तानला शेवटच्या सत्रात विजयासाठी ८६ धावांची गरज होती. पाच गडी शिल्लक असल्याने पाकिस्तान किमान हा सामना अनिर्णित ठेवण्यात यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अँडरसन आणि रॉबिनसनच्या गोलंदाजीसमोर अखेरच्या सत्रामध्ये केवळ ११ धावांच्या मोबदल्यात पाकिस्तानचे पाच गडी तंबूत परतले आणि पाकिस्तानचा संघ २६८ धावसंख्येपर्यंतच मजल मारु शकला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सामन्यादरम्यान आक्रमक क्षेत्ररक्षण करत पाकिस्तानच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्यामुळेच इंग्लंडला हा विजय मिळवता आला. इंग्लंडच्या या विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणतालिकेमध्ये पाकिस्तान जैसे थे स्थितीत आहे. म्हणजेच पाकिस्तान पहिल्या सामन्यानंतरही गुणातालिकेमध्ये भारताच्या खालीच आहे. या पराभवामुळे मालिकेबरोबरच पाकिस्तानचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा मार्गही अधिक खडतर झाला असून दुसरीकडे भारताचा मार्ग अधिक सुखकर झाला आहे.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरु होण्याआधी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेमध्ये पाचव्या स्थानी असलेल्या पाकिस्तानकडून चांगला कामगिरीची अपेक्षा होती. घरच्या मैदानांवर ही मालिका खेळवली जाणार असल्याने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांमध्ये नावाला साजेशी कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र रावळपिंडीतील कसोटीमधील शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात गडगडलेली फलंदाजी पाकिस्तानला सामन्याबरोबरच या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमधूनही बाहेर फेकण्यास कारणीभूत ठरलीय की काय असा प्रश्न पडावा अशी सध्या स्थिती आहे.

पाकिस्तान पाचव्या स्थानावर कायम असला तरी ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाने आपआपल्या आगामी कसोटी मालिकेमध्ये विजय मिळवला तर बाबर आझमनच्या नेतृत्वाखालील संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडले. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या या पराभवामुळे भारताला मोठा दिसाला मिळाला आहे. रावळपिंडीमधील कसोटीत पाकिस्तान पराभूत झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये भारताला आता करो या मरो स्थितीत खेळावं लागणार नाही. बांगलादेशला सर्व सामन्यांमध्ये पराभूत केल्यानंतर भारतात खेळवल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आता भारतीय संघावर फारसा दबाव नसणार. या मालिकेतील एखाद्या कसोटीमध्ये भारत पराभूत झाला तरी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहचण्याची आशा कायम राहणार आहे.

ऑस्ट्रेलियासाठी पात्रतेची आकडेमोड कशी असेल याबद्दल सांगायचे झाल्यास वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका एकही सामना न गमावता जिंकली तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत कमी दाबावाखाली खेळता येईल. ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमधील सर्व सामन्यांपैकी केवळ दोन विजयही पात्र ठरण्यासाठी पुरेसे आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 07:34 IST

संबंधित बातम्या