पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदच्या सुई नॅशनल गॅस पाईपलाईन या संघाला प्रेसिडेंट ट्रॉफी स्पर्धेत ४० धावांचे आव्हान पेलवलं नाही आणि त्यांच्या पदरी नामुष्की ओढवणारा पराभव जमा झाला. कराची इथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तान टेलिव्हिजन संघाने सुई गॅस पाईपलाईन संघाचा डाव ३७ धावांतच गुंडाळला आणि खळबळजनक विजयाची नोंद केली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सगळ्यात कमी धावांचा बचाव केल्याचा विक्रम आता पाकिस्तान टेलिव्हिजन संघाच्या नावावर आहे. आधीचा विक्रम ओल्डफिल्ड संघाच्या नावावर होता. त्यांनी १९७४ मध्ये एमसीसी संघाला ४१ धावा करू दिल्या नव्हत्या.

पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूद शून्यावर बाद झाला. याव्यतिरिक्त सुई संघाचे दोन फलंदाज भोपळा फोडू शकले नाहीत. टेलिव्हिजन संघातर्फे डावखुरा फिरकीपटू अली उस्मान ९ धावांत ६ विकेट्स पटकावल्या. वेगवान गोलंदाज अमद बटने ४ विकेट्स घेत अलीला चांगली साथ दिली.

पाकिस्तान टेलिव्हिनज संघाच्या १६६ धावांसमोर खेळताना सुई पाईपलाईन संघाने २३८ धावांची मजल मारली. त्यांनी ७२ धावांची आघाडी देखील मिळवली. पाकिस्तान टेलिव्हिजन संघाचा दुसरा डाव १११ धावांतच गडगडला. पण चौथ्या डावात सुई पाईपलाईन संघाची दाणादाण उडाली. अली उस्मान आणि अमान बट या दोघांनीच गोलंदाजी करत सुई पाईपलाईन संघाच्या डावाला खिंडार पाडलं. २० षटकांच्या आतच पाकिस्तान टेलिव्हिजन संघाने अविश्वसनीय विजय मिळवला. सुई पाईपलाईन संघाकडून सैफुल्ला बंगशने सर्वाधिक १४ धावा केल्या. बाकी कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

काही दिवसांपूर्वीच मसूदने १७७ चेंडूत द्विशतक पूर्ण करत फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या वेगवान द्विशतकाची नोंद केली होती. प्रेसिडेंट कप स्पर्धेत ८ संघ खेळत असून, अव्वल दोन संघांमध्ये अंतिम मुकाबला होईल. नाट्यमय विजयानंतर पाकिस्तान टेलिव्हिजन दुसऱ्या तर सुई पाईपलाईन संघ तिसऱ्या स्थानी आहे.