Aman Sehrawat Weight Loss Process at Paris Olympics 2024 : काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या अमन सेहरावतला ४.६ किलो वजन कमी करावे लागले. उपांत्य फेरीत जपानच्या रे हिगुचीकडून पराभूत झाल्यानंतर अमनचे वजन ६१.५ किलो होते. त्यामुळे आता कांस्यपदकाच्या प्लेऑफसाठी मॅटवर धडकण्यापूर्वी वजन कमी करण्याचे आव्हान त्याच्यासमोर होते. ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारा भारताचा सर्वात तरुण खेळाडू अमन सेहरावतने दहा तासांच्या आत ४.६ किलो वजन कमी केले. कारण त्याला ५७ किलो गटात सामना खेळण्यासाठी उतरायचे होते. अमन सेहरावतने कांस्यपदाच्या यशाबद्दल केला खुलासा - दुसऱ्या दिवशी सकाळी वजन केले असता, अमन शेरावतचे वजन निर्धारित मर्यादेत आल्याने प्रशिक्षक जगमंदर सिंग आणि वीरेंद्र दहिया यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. काही दिवसांपूर्वीच विनेश फोगटचे वजन १०० ग्रॅम जास्त आढळल्याने तिला अंतिम फेरीतून अपात्र घोषित करण्यात आले होते. अमनने आपल्या दोन वरिष्ठ प्रशिक्षकांसह दीड तास मॅटवर सराव करून ‘मिशन’ सुरू केले. यानंतर एक तास गरम पाण्याने आंघोळ केली. कारण घामाने वजनही कमी होत असल्याने अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर प्रत्येकी पाच मिनिटांची पाच 'सौना बाथ' सत्रे झाली. अवघ्या १० तासात ४.६ किलो वजन कमी केले - शेवटच्या सत्रानंतर, अमनचे वजन ९०० ग्रॅम जास्त होते, म्हणून त्याची मालिश करण्यात आली आणि प्रशिक्षकांनी त्याला हलके जॉगिंग करण्यास सांगितले. यानंतर १५ मिनिटे धावला. यानंतर पहाटे साडेचारपर्यंत त्याचे वजन ५६.९ किलोवर पोहोचले. यावेळी अमनला लिंबू आणि मध आणि कोमट पाण्यासोबत कॉफी देण्यात आली. त्यानंतर अमनला झोप येत नव्हती. अमन म्हणाला, 'मी रात्रभर कुस्तीच्या सामन्यांचे व्हिडिओ पाहिले.' हेही वाचा - Paris Olympic 2024 Live, Day 15 : रितिका हुडाने घडवला इतिहास, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक प्रशिक्षकाने सांगितला वजन कमी करण्याचा संपूर्ण प्रवास - प्रशिक्षक म्हणाले, 'आम्ही दर तासाला त्याचे वजन तपासत राहिलो. रात्रभर आणि दिवसभर झोपही आली नाही. विनेशसोबत घडलेल्या प्रकारानंतर तणाव निर्माण झाला होता. वजन कमी करणे हा नित्यक्रमाचा भाग असला तरी यावेळी आम्हाला दुसरे पदक गमावायचे नव्हते. अमनने पोर्तो रिकोच्या डेरियन क्रुझचा पराभव करून कांस्यपदक जिंकले.'