महिला विश्वचषकातील उपांत्य सामन्यातील दमदार खेळीनंतर क्रिकेट जगतात हरमनप्रीत कौरचा बोलबाला सुरु आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झंझावत शतकी खेळणाऱ्या हरमनप्रीतमध्ये असणारी प्रतिभा सर्वप्रथम भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडुलजी यांनी हेरली. हरमनप्रीत एक चांगली अष्टपैलू खेळाडू असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला पश्चिम रेल्वेकडून खेळवण्यासाठी एडुलजी यांनी खास प्रयत्न केले. ‘इंडियनएक्सप्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये एडुलजी म्हणाल्या की,  २४ वर्षीय हरमनप्रीतला दक्षिण रेल्वेकडून ऑफर मिळाली होती. पण चांगले पद देऊन तिला पश्चिम रेल्वेकडून खेळण्याचा पर्याय उपलब्ध होता. दक्षिण रेल्वेमध्ये ती कनिष्ठ पदावर कार्यरत होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून खेळण्यासाठी मी तिला चांगले पद ऑफर केले. मी तिला अधिकारी पदाची ऑफर दिली. यांसदर्भात दिल्लीला पत्र पाठवण्यात आले. मात्र राष्ट्रपतींकडून याला मान्यता मिळाली नाही. त्यानंतर यासंदर्भात सचिनची मदत घेतली. एडुलजी म्हणाल्या की, तिच्या हरमनप्रीतच्या नियुक्तीसाठी राज्यसभा सदस्य आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली.  त्यांनी याप्रकरणी रेल्वेमंत्री आणि प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला. त्यानंतर हरमनप्रीतला पश्चिम रल्वेमध्ये नोकरीत समाविष्ट करुन घेण्यात आले.

उपांत्य सामन्यात हरमनप्रीतने १७१ धावांची धुंवाधार खेळी केली होती. तिच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. हरमनप्रीतने तिच्या खेळीने लाखो क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. तिच्या योगदानामुळेच २००५ नंतर दुसऱ्यांदा भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली. रविवारी भारतीय संघाचा यजमान इंग्लंडविरुद्ध सामना रंगणार आहे. विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारताने बलाढ्य इंग्लंडला पराभूत करुन स्पर्धेची सुरुवात केली होती. या स्पर्धेचा शेवटही सलामीसारखाच करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल. या सामन्यात हरमनप्रीतकडून पुन्हा एकदा चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.