Surkyakumar Yadav T20I Captain Story: रोहित शर्मा भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार असताना हार्दिक पंड्याकडे संघाचं उपकर्णधारपद होतं. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिकने अनेकदा संघाचं नेतृत्त्व केलं होतं. टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. निवृत्ती जाहीर केल्यानंतर रोहितच्या जागी हार्दिक पंड्या असतानाही अचानक सूर्यकुमार यादवला संघाचं कर्णधारपद देण्यात आलं. हा निर्णय नेमका कोणी घेतला याचा खुलासादेखील त्याने केला आहे.

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकल्यानंतर कर्णधारपद कसं मिळालं, याबाबत मोठा खुलासा केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सूर्यकुमारने सांगितलं की, रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर टी-२० संघाची जबाबदारी आपल्याकडे येणार असल्याची माहिती त्याला नेमक्या कोणत्या परिस्थितीत मिळाली, हे त्याने दीड वर्षानंतर पहिल्यांदाच उघड केलं.

हार्दिक पंड्याला डावलून सूर्याला कॅप्टन करण्याचा निर्णय कोणाचा?

सूर्यकुमार यादवला कर्णधारपद दिल्याचा निर्णय जाहीर झाल्यावर अनेकांना धक्का बसला होता, कारण २०२२-२३ हंगामात रोहित आणि विराट कोहली यांनी टी-२० क्रिकेटमधून विश्रांती घेतलेली असताना हार्दिक पंड्या संघाचं नेतृत्व करत होता. सूर्यकुमार यादव याने पुढे सांगितलं की, टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारताच्या पहिल्या द्विपक्षीय मालिकेपूर्वी काही दिवस आधीच त्याला कर्णधारपदाबाबत माहिती मिळाली. ही बातमी त्याला तेव्हाचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली होती.

“मालिकेपूर्वी आम्ही काही दिवस वाट पाहत होतो. त्यानंतर श्रीलंका दौऱ्याच्या तीन-चार दिवस आधी जय भाईंचा मला फोन आला. आम्ही श्रीलंकेत जाणार होतो. त्यांनी मला फोन करून सांगितलं की पुढे टी-२० संघाचं कर्णधारपद माझ्याकडे दिलं जाणार आहे. त्यांनी सर्वात आधी मला ही माहिती दिली. पण मला खात्री होती की हे सगळं आधीच रोहित भाई आणि अजित भाई यांनी ठरवलं होतं,” असं तो म्हणाला.

यानंतर त्याने स्पष्ट केलं की, “गौतम गंभीर नंतर संघात आले. त्यावेळी रोहित भाई, अजित भाई आणि तेव्हाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी जय भाईंसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला की पुढे भारताचं नेतृत्व मी करावं.”

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताचा टी-२० संघ सर्वात यशस्वी संघ ठरला. द्विपक्षीय मालिकांमध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर भारताने टी-२० विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा मोठा पराभव करत विजेतेपद पटकावले. या विजयासह भारताने टी-२० वर्ल्डकप सलग दुसऱ्यांदा जिंकणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवला, तसेच घरच्या मैदानावर ही ट्रॉफी जिंकणारा पहिला संघही ठरला.