Team India Semi Final Scenario In ICC T20 World Cup 2026: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने दमदार खेळ करत वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात डॅनी वॅट-हॉजच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने हा सामना ३८ धावांनी खिशात घातला. या विजयासह यजमान इंग्लंड संघ आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना लॉर्ड्सच्या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. वेस्ट इंडिजचा संघ या धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. इंग्लंडने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला, तर भारतीय संघासाठी कसं असेल समीकरण? जाणून घ्या.
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय फसला. कारण इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. डॅनी वॅट-हॉजने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तिने मिळालेल्या संधीचा फायदा घेत गोलंदाजांवर हल्ला चढवला. चौफेर फटकेबाजी करुन तिने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इंग्लंडकडून कर्णधार हिथर नाईटने २६ चेंडूंचा सामना करत ४३ धावांची खेळी केली. तर डॅनी वॅट-हॉजने ६५ धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर इंग्लंडने २० षटकांअखेर ७ गडी बाद १८६ धावा केल्या.
वेस्ट इंडिजला हा सामना जिंकण्यासाठी १८७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हेनरीने पूर्ण जोर लावला. तिने शेवटपर्यंत झुंज देत नाबाद ५१ धावांची खेळी केली. पण तिचं अर्धशतक व्यर्थ गेलं. इंग्लंडने वेस्ट इंडिजला आव्हानापासून ३८ धावांआधीच रोखलं. हा सामना जिंकून इंग्लंडचा संघ महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला.
भारतीय संघासाठी कसं आहे समीकरण?
भारतीय संघाला जर सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाला हरवणं. असं झाल्यास भारतीय संघ ८ गुणांपर्यंत पोहोचेल, हे गुण सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पुरेसे आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेने आपले पुढील सामने जिंकले, तरीदेखील चांगल्या रनरेटच्या बळावर भारतीय संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरेल.
समीकरण -२
भारतीय संघाचे अजूनही २ सामने शिल्लक आहेत. या २ पैकी १ सामना गमावला, तर भारतीय संघाला ६ गुणांवर समाधान मानावं लागेल. असं झाल्यास भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने एक सामना गमवावा अशी प्रार्थना करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेचे पुढील २ सामने बांगलादेश आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांविरूद्ध होणार आहेत. जर दक्षिण आफ्रिकेने १ सामना गमावला, तर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. पण जर दोन्ही सामने जिंकले, तर भारतीय संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
